मुंबई (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी 40 दिवसांचा अवधी दिला होता. या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस होता. दिवसभर सरकारकडून मनोज जरांगे पाटलांना कोणतंही निवेदन देण्यात आलं नाही. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आज होणार्या दसरा मेळाव्याकडे होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलनाचा उल्लेख त्यांच्या भाषणात तर केला, परंतु, मनोज जरांगे पाटलांना अपेक्षित असलेला निर्णय सरकारने दिला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी सर्वसामान्य मराठा कुटुंबातील आहे. मला त्यांचे दुःख – वेदना कळतात. मलाही त्यांची जाणीव आहे. जस्टिस शिंदे यांची समिती खूप काम करतेय. ही समिती 24 बाय 7 काम करतेय. पुनर्विचार याचिका दाखल झाली आहे. एक विंडो ओपन झाली आहे. म्हणून कोणावरही अन्याय न करता, कोणाचंही आरक्षण काढून न घेता, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार. या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार. इतर कोणावरही अन्याय न करता आरक्षण देणार. कारण हे सगळे आपले आहेत.
शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मी तिथे जाऊन त्यांच्यासमोर जाऊन नतमस्तक होतो, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेजवळ गेले. तिथे त्यांनी महाराजांना अभिवादन केलं. आणि पुन्हा भाषणस्थळी येऊन मराठ्यांना आरक्षण देणारच असा विश्वास दिला.
मी आपल्याला विनंती करतो की टोकाचं पाऊल उचलू नका. आत्महत्या करू नका. आपल्या कुटुंबाला वार्यावर सोडू नका. आपल्या मागे मुला-बाळांचा विचार करा. हे सरकार तुमचं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी आरक्षण देण्याचं काम केलं. हायकोर्टात हे आरक्षण टिकलं, पण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. ते का टिकलं नाही त्यावर मी आता बोलू इच्छित नाही. आपल्यासाठी सरकार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास हे सरकार कटिबद्ध आहे. धनगर, मराठा, ओबीसी, धनगर, कुणबी, आदिवासी यांच्यात द्वेष, लढाई आहे. राज्यात अशांतता पसरवण्याचं काम काही जण करत आहेत. त्यांच्या हातात कोलीत देणार का? काहींना वाटतंय की एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद अडचणीत आणू. हा गरीब माणूस मुख्यमंत्री झाला कसा? पण मी एक सांगू इच्छितो की मला या गोर-गरीब जनतेपेक्षा मुख्यमंत्री पद महत्त्वाचं नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.