मराठा आरक्षण : मादळमोहीत तीन तरुण टॉवरवर चढले
गेवराई तालुक्यात सर्कलवाईज साखळी उपोषण
आज गेवराई शहरातून निघणार भव्य कँडल मार्च
गेवराई (रिपोर्टर)- मराठा समाजाने सरकारला दिलेली डेडलाईन संपल्यानांतर पुन्हा जरांगे पाटील सराटे अंतरवलीत उपोषणाला बसले. त्यांना पाठींबा म्हणून ठिकठिकाणी आंदोलन, उपोषण सुरू आहे. गेवराई शहरातील शास्त्री चौकात मराठा बांधवांच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. या साखळी उपोषणात तालुक्यातील रोज एक सर्कल सामील होऊन उपोषण करत आहे. त्याठिकाणी सकाळी प्रबोधनपर व्याख्यान तर नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होत आहे. दुसरीकडे तालुक्यातील मादळमोही येथे साखळी उपोषण सुरू असताना तीन तरुण मोबाईल टॉवरवर चढल्याने एकच गोंधळ उडाला. दुपारी उशिरापर्यंत हे तरुण खाली उतरले नव्हते. त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठींबा म्हणून गेवराई तालुक्यातील पाचेगाव, जातेगाव, मादळमोहीसह आदी सर्कलमध्ये साखळी उपोषण सुरू आहे तर गेवराई शहरात तालुक्याच्या वतीने एक साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणात तालुक्यातील रोज एका सर्कलच्या पंधरा ते वीस गावकर्यांनी त्या उपोषणाला हजेरी लावून दिवसभर तिथे बसत आहेत. त्यामध्ये सकाळी एक व्याख्यान आणि संध्याकाळी एका नामवंत कीर्तनकाराचे कीर्तन होत आहे. आज संध्याकाळी सुशेन नाईकवाडे यांचे कीर्तन होणार आहे. सकाळी गणेश फरताडे यांनी व्याख्यानाची सेवा दिली. मादळमोही येथे शांततेत साखळी उपोषण सुरू असताना तीन तरुण अचानक टॉवरवर चढत मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी करू लागले. या वेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव तेथे जमा झाले होते. तरुणांना खाली उतरण्याचे आवाहन केले मात्र दुपारपर्यंत हे तरुण टॉवरवरच बसून होते.