बीड (रिपोर्टर):- मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात काही ठिकाणी हिंसक आंदोलन झाले होते. या आंदोलनाच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. इंटरनेट बंद असल्याने शासकीयसह खासगी कामकाज पुर्णत: बंद झाले होते. आज सकाळपासून नेट सुरू झाल्याने कामकाज पुर्वपदावर येऊ लागले तर एसटी महामंडळाच्या बसेसही बंद होत्या. बस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. बसेसही सकाळपासून सुरू झाल्या आहेत.
तीन दिवसांपूर्वी बीडसह माजलगाव येथे जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या, या घटनांमुळे जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरातील इंटरनेट सेवा बंद केली होती. नेट बंद असल्यामुळे ऑनलाईन कामकाज पुर्णत: ठप्प झाले होते. तीन दिवसात नेट बंद असल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. आंदोलनात एसटी महामंडळाच्या बसेसही फोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे महामंडळाने बस जागेवर उभ्या केल्या होत्या. बीड आगारातील 70 पेक्षा जास्त बस फोडण्यात आल्या होत्या. इतर महामंडळाच्याही बसेस फोडल्या होत्या. यात महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. परिस्थिती पुर्वपदावर आल्यानंतर आज महामंडळाच्या बसेस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आहेत.