मराठा आरक्षणासाठी 19 ग्रा.पं.मध्ये मतदान नाही
उद्या जिल्ह्यातल्या 154 ग्रा.पं.साठी मतदान
संवेदनशील ग्रा.पं.मध्ये वाढीव पोलीस बंदोबस्त नेकनूर, पात्रूडसह अन्य मोठ्या ग्रा.पं.च्या निवडणुका
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातल्या 186 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. गेले आठ ते दहा दिवस निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रचाराचा धुमाकूळ सुरू होता. निवडणुकीच्या दरम्यान मराठा आरक्षणाचा प्रश्न सुरू असताना 19 ग्रामपंचायतींनी आरक्षणासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून या 19 ग्रा.पं.मध्ये एकही उमेदवारी अर्ज आलेला नाही. उद्या होणार्या निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त कडेकोट ठेवण्यात येणार आहे. जे संवेदनशील गाव आहेत त्या गावांकडे प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार. पात्रूड, नेकनूरसह इतर काही ग्रा.पं. मोठ्या आहेत. या मोठ्या ग्रा.पं.मध्ये चुरशीच्या लढती झालेल्या आहेत. मतदान झाल्यानंतर दुसर्या दिवशी मतमोजणी होणार आहे.
बीड जिल्ह्यासह राज्यभरातल्या ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी उद्या दि. 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. गावपातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीला अत्यंत महत्व असतं. सरपंचपद जनतेतून असल्याने प्रत्येक ग्रा.पं. अंतर्गत अटीतटीच्या लढती झालेल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या 186 ग्रा.पं.साठी निवडणुका घोषीत करण्यात आल्या होत्या, निवडणुकीच्या दरम्यान मराठा आरक्षणाचा प्रश्न सुरू होता. ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत होते. याच दरम्यान 19 ग्रा.पं.अंतर्गत आरक्षणासाठी बहिष्कार टाकण्यात आला. या ग्रा.पं.मध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. बीड तालुक्यातील 10, माजलगाव 33, गेवराई 35, आष्टी 4, धारूर 17, परळी 3, शिरूर 20, पाटोदा 12, अंबाजोगाई 4, वडवणी 8 आणि केजमध्ये 24 ग्रा.पं.साठी मतदान होणार आहे. या ग्रा.पं.तून 1300 सदस्य निवडून द्यायचे आहेत. ज्या ग्रामपंचायती संवेदनशील आहेत त्या ग्रामपंचायतींकडे जिल्हा प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे. बीड तालुक्यातील नेकनूर ही ग्रा.पं. मोठी असल्याने या ग्रामपंचायतीमध्ये अटीतटीची लढत झालेली आहे. त्याचबरोबर पात्रूड व अन्य काही ग्रा.पं. मोठ्या आहेत त्या ठिकाणीही गावपुढार्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. उद्या मतदान झाल्यानंतर परवा दिवशी मतमोजणी होणार आहे.
उद्या नेकनूरचा बाजार भरणार नाही
ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होत आहे. नेकनूर ग्रा.पं.साठीही निवडणूक होत असल्याने उद्याचा बाजार रद्द करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदा हजारे यांनी दिली आहे. बीड तालुक्यात 10 ग्रा.पं.साठी मतदान होत आहे. त्यासाठी 51 मतदान केेंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.