Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीड‘जलजीवन योजने’त जळगावची आघाडी पालघर, नंदूरबार, बीड, यवतमाळ तहानलेलेच

‘जलजीवन योजने’त जळगावची आघाडी पालघर, नंदूरबार, बीड, यवतमाळ तहानलेलेच


मुंबई (रिपोर्टर) मुंबई: ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ आणि शाश्वत पाणीपुरवठा करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘जल जीवन’ या महत्त्वाकांक्षी योजनेत राज्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली असली तरी पालघर, नंदूरबार, बीड, यवतमाळ हे जिल्हे अद्यापही तहानलेलेच आहेत.


राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगावात केंद्राच्या ‘हर घल जल’ योजनेअंतर्गत सर्वच्या सर्व म्हणजे 6 लाख 86 हजार घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचविण्यात यश आले आहे. त्या खालोखाल जालना, धुळे, नागपूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील 80 टक्क्यांहून अधिक घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचले आहे. जालना (3.85 लाख घरांपैकी 2.98 लाख घरांमध्ये पाणी), धुळे (3.19 लाख घरांपैकी 2.90 लाख घरे), नागपूर (3.65 लाख घरांपैकी 3.08 लाख), कोल्हापूर (6 लाख घरांपैकी 5.06) अशी या जिल्ह्यांची कामगिरी आहे. मुंबईपासून काही अंतरावर असलेला पालघर जिल्हा मात्र सगळयत मागे आहे. आदिवासीबहुल पालघरमधील 4 लाख 10 हजार घरांपैकी केवळ 1 लाख 39 हजार (33 टक्के) घरांपर्यंत पाणी पोहोचले आहे. त्याचबरोबर नंदूरबार, बीड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड हे जिल्हेही अद्याप तहानलेले आहेत.नंदूरबारमधील 3.04 लाख घरांपैकी अवघ्या 1.20 लाख घरांपर्यंत पाणी पोहोचले आहे. एप्रिल-मे महिन्यात पाणीटंचाईमुळे वर्तमानपत्राचे मथळे व्यापणारम्या बीडमधील 4.69 लाख घरांपैकी अवघ्या 1.90 लाख घरांपर्यंत पाणी पोहोचले आहे. तर गडचिरोलीतील 2.16पैकी 97 हजार, चंद्रपूरमधील 3.82 लाख पैकी 1.77 लाख, यवतमाळमधील 5.17 लाखपैकी केवळ 2.63 लाख घरांमध्ये नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. यात पुनर्विकासामुळे खासगी प्रयत्नांतून नळाद्वारे पोहोचलेल्या पाणी योजनांचाही समावेश आहे. अर्थात हे प्रमाण तुलनेत कमी आहे. पाण्यासाठी गावागावात महिलांची आणि लहान मुलांची होणारी वणवण थांबविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी केंद्राने राज्यांच्या सहकार्याने प्रत्येकी 50 टक्के भागीदारीतून ही योजना सुरू केली.

Most Popular

error: Content is protected !!