Friday, January 28, 2022
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- ‘जय भीम’ म्हणजे…

अग्रलेख- ‘जय भीम’ म्हणजे…


गणेश सावंत
मो. नं. ९४२२७४२८१०

स्वतंत्र भारताच्या सुवर्ण महोत्सवाचे सोहळे-ओहळे दणक्यात सुरू आहेत. स्वतंत्र्याची व्याख्या आणि प्रगल्भ झालेल्या लोकशाहीचे गुणगाण भारतमाता गाताना दिसून येत आहे. व्यवस्थेतल्या हुकुमी सत्तेची बढाई पदोपदी पहायला मिळत आहे. स्वतंत्र्याच्या ७५ वर्षात खरच तुम्ही-आम्ही स्वतंत्र आहोत का? हा सवाल सध्याच्या हुकुमी व्यवस्थेमुळे एकीकडे विचारला जात असतांनाच दुसरीकडे ‘जय भीम’चा नारा अवघ्या देशात चित्रपटाच्या माध्यमातून घुमतांना दिसून येत आहे. जय भीम हा नारा आहे की सत्य-न्यायाचे ब्रीद आहे हे जय भीम चित्रपट पाहिल्यानंतर जेवढे लक्षात येते तेवढेच स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीतही आजही तीन दुबळे आदिवासी दलित अपरिचीत सर्वसामान्य शिक्षणापासून आणि न्यायापासून किती दूर आहेत याचं जळजळीत भयाव वास्तव जय भीमच्या माध्यमातून जेंव्हा समोर येत तेंव्हा खरच आपण लोकशाहीच्या देशामध्ये वावरतोय का? हा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही आणि काही क्षणात या प्रश्‍नाच उत्तर वकील चंद्रुसारख्या लढवय्या माणसाकडे पाहिल्यानंतर खरच आपण लोकशाहीच्याच देशात राहतो याचा अभिमानही वाटतो. आम्ही जेंव्हा हा चित्रपट पाहिला तेंव्हा त्याचे कथानक पाहून सुन्न झालो. ज्या देशामध्ये छत्रपती शिवराय, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे सर्वास पोटास लावणे आहे हे ब्रीद उच्चारणारे राजे आणि समाज सुधारक होवून गेले त्या देशात आजही उपेक्षितांचे हाल होतात. त्यांना कसपटाप्रमाणे वागणूक दिली जाते हेच तामिळनाडुच्या कुरवा आदिवासी जमातीतील राजकन्न आणि शेणगाई या जोडप्याच्या सत्य कथानकामधून दिसून येते. इ.स. १९९३ साली या जोडप्यावर

बितलेली
आपबिती

चे हे कथानक आहे. राजकन्ना आणि शेणगाई हे कुरवा आदिवासी समाजातले जोडपे चोरीचा आरोप करून राजकन्नाला पोलीस पकडून नेतात. त्याचे हाल हाल करून त्याला अक्षरश: जिवानीशी मारले जाते. पोलीस कोठडीत मरण पावलेल्या राजकन्नाला स्टेशन बाहेर नेऊन अपघाताचा देखावा दाखवला जातो. त्याचबरोबर त्या राजकन्नाबरोबर असलेले दोघे पळून गेल्याचेही दाखवले जाते. मात्र शेणगाई आपल्या नवर्‍याची वाट पहात असते. त्याचा शोध घेण्यासाठी ती सर्वत्र फिरत असते. गरोदर असलेल्या शेणगाईलाही पोलिसांकडून हिण वागणूक मिळते. शेवटी वकील चंद्रा याची भेट होते आणि इथून या चित्रपटात भारतीय लोकशाहीमधले खरे वास्तव समोर मांडले जाते. लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेल्या लोकशाहीच्या राजकारणात उच्च जातीचे आणि भांडवलदार कसे राज्य करतात, जातीला किती आजही महत्व आहे, उच्च जातीच्या लोकांचे खालच्या जातीच्या लोकांसोबत कसे वर्तन आहे हे यामध्ये दाखवण्यात आले आहे.


जात विचारून
साव की गुन्हेगार दाखवणारा पहिलाच ‘सिन’ या चित्रपटातला पाहिल्यानंतर जातीला किती महत्व दिला जातय हे यावरून स्पष्ट होतं. कारागृहाच्या बाहेर वेगवेगळ्या गुन्ह्यातले लोक सोडले जातात तेव्हा वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या गाड्या त्या ठिकाणी उभ्या असतात. विविध चोर्‍या अथवा अन्य घटनांचा तपास न लावता सुटलेल्या निरपराध परंतू आरोपी असलेल्यांची त्या ठिकाणी जात विचारली जाते. जे उच्च जातीचे आहेत त्यांना सन्मानाने घरी जाण्याचे सांगण्यात येते, मात्र जे आदिवासी आहेत, जे दलित आहेत, जे वंचित आहेत त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी थांबवून अन्य गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या हवाली केले जाते. हा सिन पाहिल्यानंतर आजच्या हुकमी राजवटीचे तंतोतंत अनुकरण तेव्हा आणि आजही होतच असल्याचे दिसून येते. आज ज्या पद्धतीने केेंद्रिय तपासी संस्था आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करतात, सीबीआय असेल, ईडी असेल अथवा सीएनए संस्थातील अधिकार्‍यांकडून पैशासाठी म्हणा अथवा केेंद्राच्या हुकमाची तालिम म्हणा, निर्दोषांनाही जसं गुंतवलं जातं तसं गाव पातळीवर खालच्या जातीला पोलिसी यंत्रणेकडून आणि जात्यांध धर्म मार्तंडांकडून तोच त्रास होत असल्याचे यावरून दिसून येते. यापेक्षाही भयावह एक प्रसंग या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे, तो प्रसंग म्हणजे एक समाज कार्य करणारी तरुणी प्रौढांसह विद्यार्थ्यांना अक्षर ओळख करून देत असते, अक्षर ओळख करताना या प्रौढांचा मतदानाचा हक्क यावा म्हणून ती मतदान यादीत नाव नोंदणी करण्यासाठी जाते, तेव्हा तिथला गावकी पुढारी यांना मताचा हक्क देऊन आणि शिक्षण देऊन तुला करायचे काय आहे, यांना भिकच मागायची आहे, ते शिकले तर ते पुन्हा आमच्या डोक्यावर हक्क मागण्यासाठी नाचतील, हा संवाद अखंड देशवासियांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आणि अखंड हिंदुस्तानाचे मागासपणाचे उत्तर देणारा ठरतो.
आम्ही थोरले
असताना वैज्ञानिक अथवा शैक्षणिकदृष्ट्या मागास का? हा प्रश्‍न इथं नक्कीच प्रत्येकाला पडतो. ‘सोन्याची चिडिया’ असणार्‍या सर्वश्रीमंत भारताची प्रगती का झाली नाही? याचे उत्तर इथेच सापडते. सोळाव्या शतकाच्या आधीपासून या देशात उच्चवर्णीय सोडता अन्य कुठल्याही जात-पात-धर्म-पंथातील व्यक्तीला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. वेद म्हणण्याचे अधिकार नव्हते. कवित्व करण्याचा अधिकार नव्हता. न्याय-हक्क मागण्याचा तर प्रश्‍नच नव्हता. जातीच्या उतरंडीत कोणाला ब्रह्माच्या मुखातून तर कुणाला ब्रह्माच्या बेंबीतून जन्माला घालणार्‍या इथल्या व्यवस्थेने आम्हाला शिकूच दिलं नाही. तरीही समाज प्रबोधन करणारे ‘जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी ज्यातक’ म्हणत त्रास देणार्‍यांनाही सर्वकाही मिळो चा आशावाद घेत संत ज्ञानेश्‍वर हे धर्ममार्तंडांच्या उरावर शिकले. वेदाचा तो अर्थ आम्हाशी ठावा, इतरांनी व्हावा भार माथा म्हणत ‘आम्हा घरी धन शब्दाची रत्ने शब्दाची शस्त्रे’ म्हणत जगद्गुरू संत तुकोबांनी शिक्षणासाठी धर्ममार्तंडांबरोबर विद्रोह केला. शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे तो जे पेयील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले. संत ज्ञानेश्‍वर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कार्यकाळ हा आठ-दहा शतकांचा कार्यकाळ आहे. या आठशे वर्षांच्या कालखंडात आमच्या पिढ्या केवळ अशिक्षितपणामुळे जन्मल्या आणि त्यांच्या समधींवर गवत उगले, हे महापाप केवळ आणि केवळ धर्ममार्तंडांच्या अप्पलपोटी धोरणामुळे झाले. म्हणनूच अवघ्या जगातले अन्य देश झपाट्याने विज्ञान युगात आकाश-गंगेची सफर करतात तरीही आमच्या इतिहासाच्या वैचारिक श्रीमंतीवर आमचे भारतीय तोडीस तोड उत्तर देतात. परंतु आजही


नांगरी वस्तीतली जात
जेव्हा बाहेर येते तेव्हा स्वतंत्र भारतातल्या कुठल्याही स्वाभिमानी व्यक्तीला अपमान वाटतो. देशात दोन वस्त्या आहेत, एक नांगरी आणि दुसरी नागरी. पहिली नांगरी वस्ती ही काबाडकष्ट करणारे शेतकरी, कष्टकरी, कामकरी, दिनदलित आदिवासी आणि दुसरी नागरी वस्तीतील शहरात राहणारी नांगरी वस्तीतली जात जेव्हा बाहेर दिसून येते तेव्हा माणसातलं माणूसपण संपलं की काय, हा प्रश्‍न पडायला लागतो. जय भीम चित्रपटात ज्या पद्धतीने जात पाहून वर्गवारी केली जाते त्याच पद्धतीने आजही जात-पात-धर्म-पंथाच्या नावावर माणसाची ओळख केली जात आहे. प्रत्येक अन्यायाला वाचा पोडण्यासाठी तिथं चंद्रु असेलच हे सांगणे कठीण आहे, परंतु अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रत्येकाने चंद्रु झाले तर …! नांगरी वस्तीतली जात संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही.
जय भीम म्हणजे ?
तामिळनाडुत घडलेल्या घटनेचे सत्य कथानक ‘जय भीम’ नावाच्या चित्रपटातून दाखवण्यात आले. पाच भाषांमधून हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो प्रत्येकाला भावला. परंतु ‘जय भीम’ म्हणजे खालच्या जातीचा नमस्कार असं जर काहींना वाटत असेल आणि काही तथाकथीत जातीयवादी व्यवस्था असा प्रचार करत असतील तर त्यांच्यासारखे बेअक्कल, विवेकशून्य ते कोणीच नाही. ‘जय भीम’ म्हणजे कायद्याचा विजय आणि लोकशाहीचा मजबूत स्तंभ होय.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!