Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडन.प.निवडणुकीत राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार -आ.क्षीरसागर

न.प.निवडणुकीत राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार -आ.क्षीरसागर


वैजिनाथ तांदळेंसह अनेक गावचे सरपंच, चेअरमन, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
बीड (रिपोर्टर) ‘आम्ही लोकांसमोर प्रामाणिक भूमिका घेऊन जातोत, म्हणूनच लोक आमच्यावर विश्वास ठेवतात. यापुढे कुठल्याही निवडणुका असोत त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच विजय असेल. आगामी नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, यापुढे आमच्या सोबत राहून विरोधकांसोबतचे मॅनेजमेंटचे राजकारण चालणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही माझी भूमिका आहे आणि पुढेही राहिल. विश्वासघात अथवा पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आपल्याकडे होत नाही, इथे प्रत्येकाला सन्मानाची वागणूक देण्याचे काम केले जाते’ असे आ. संदीप क्षीरसागरांनी म्हटले.


ते बीड येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनात आयोजीत कार्यकर्त्यांच्या प्रवेश सोहळ्यात बोलत होते. या वेळी माजी आ. सय्यद सलीम, माजी आ. सुनिल धांडे, माजी आ. उषाताई दराडे, बबनराव गवते, कल्याण आखाडे, डी.बी. बागल हे उपस्थित होते. शिवसेनेचे सचिव तथा राजुरी परिसरातले मोठे प्रस्थ वैजिनाथ तांदळे यांचा आज संदीप क्षीरसागरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. सहा गावच्या सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांचा हा प्रवेश सोहळा होता. या वेळी पुढे बोलताना आ. क्षीरसागर म्हणाले की, स्व. काकु-नानांपासून राजुरी आणि वंजारवाडी वेगळी नाही. जेवढे प्रेम राजुरीवर होते तेवढेच वंजारवाडीसह परिसरातील गावांवर काकु-नानांचे होते. त्यांच्या आशीर्वादानेच आणि मतदारसंघातल्या जनतेच्या प्रेमाने आपल्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. विरोधकांकडे मात्र त्यांच्या संस्थेचे पाच-पन्नास कर्मचारी दिसून येतात. मी राजकारण करताना समाजकारणाला महत्व देतो. माझ्याकडच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असतो. निवडणुकीमध्ये जिथे जे शब्द दिले ते पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न मी करत आहे. काही ठिकाणी विकास कामे झाली आहेत त्याची गुणवत्ता आणि दर्जा टिकवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. माझ्याकडे गोड बोलून कोणाचा विश्‍वासघात करता येत नाही, मी कुणाच्या पाठित खंजीर खुपसत नाही. प्रत्येकाला विश्‍वासात घेऊन कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. सर्वांच्या प्रेम-आशिर्वादाने यापुढे जिल्हा परिषदेच्या आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकवला जाईल, असा विश्‍वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

काकु-नानांपासून वंजारवाडीचे राजुरीशी घनिष्ठ आणि प्रेमाचे संबंध आहेत. त्यांच्या प्रेरणेतूनच आज पुन्हा ते संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि राजुरी सर्कलचा सर्वांगीन विकास करण्यासाठी आपण आ. संदीप क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरवले आहे, असे राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले वैजिनाथ तांदळे यांनी म्हटले. या वेळी तांदळे यांच्या सोबत सहा गावचे सरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!