Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडगावागावात नरभक्षी सन्नाटा अफवामुळे संभ्रम

गावागावात नरभक्षी सन्नाटा अफवामुळे संभ्रम

किन्ही गावातील काही रहिवाशांचे पलायन, लहान मुलांनी स्वत:ला कोंडून घेतले; सायंकाळी पाच नंतर घराची दारे बंद करून घेतात ग्रामस्थ
संपुर्ण रात्र जीव मुठीत घेवून जागरण करण्याची वेळ, आष्टी तालुक्यातील सुर्डी, किन्ही, मंगरूळ, वेताळवाडी, शेरी, बीडसांगवी,महादेवदरा,जोगेश्‍वरी पारगाव, खडकत शिवारात दहशत

रिपोर्टरच्या प्रतिनिधीची घटनास्थळी ग्राऊंड रिपोर्टींग, वनात वनविभागाच्या कर्मचार्‍यासोबत थेट पिंजर्‍यापर्यंत प्रतिनिधीने किन्ही गावात जावून लहान मुलांना दिला दिलासा
वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी कडाक्याच्या थंडीत मिळेल ते खाऊन घेत आहेत बिबट्याचा शोध; सुरक्षेच्या नावावर त्यांच्या हातात फक्त दंडुके
रिपोर्टरच्या टीमला पाहून वन विभाग कर्मचार्‍याचे मनोबल वाढले, चार तास रिपोर्टरची टीम वनात
शेतातील कामे रखडली, मजूर मिळेना, दिवसाढवळ्या घराच्या बाहेर निघण्यास ग्रामस्थ भयभीत; प्रशासनाचे सुरक्षेसाठी आवाहन, रात्रपाळीत पाणी देणार्‍यांनो सावधान
लॉकडाऊनपुर्वीच झाले होते बिबट्याचे बीड जिल्ह्यात आगमन, आष्टी तालुक्यातील कडा परिसरात शिरापुर गावात दिसून आला होता बिबट्या, त्यावेळी बिबट्याच्या भितीने रानडुकरे पळून गेल्याने शेतकरी होते खुष
लॉकडाऊनच्यावेळी वाहने बंद होती, रस्ते सामसूम होते, चोहीकडे सन्नाटा पसरलेला होता अशात उपासमारीची वेळ म्हणून रानडुक्कराच्या शोधात बिबट्या बीड जिल्ह्यात दाखल झाल्याची मिळाली माहिती
बिबट्या असल्याचे किंवा बिबट्या दिसल्याचे कॉल येताच अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी जावून करतात पाहणी; अफवा पसरविण्यापेक्षा वन विभागाला सहकार्य करण्याची गरज
एका रात्री बिबट्या २५ ते ३० किलोमीटर अंतर पार करतो, म्हणूनच वन विभागाची दमछाक; ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय त्या ठिकाणी लावले पिंजरे
सोमवारी पहाटे खडकत शिवारात सिना नदीच्या काठावर बिबट्याचे ठसे दिसून आल्याने नदीच्या कडेला शोध घेण्यासाठी पहाटेपासूनच वन पथक रवाना; जोगेश्‍वरी पारगाव, सुर्डी, किन्ही या गावासह महादेवदर्‍यात बसवले पिंजरे
शनिवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पिडितांची भेट घेतली, तर सुरेश धस यांनी वनात जावून वन कर्मचार्‍यांना जेवण दिले
कोतन येथील समाजसेवक नितीन पाटील यांनी बिबट्या असलेल्या परिसरात घेवून जाण्यास रिपोर्टरच्या टीमला केली मदत
गेल्या दहा दिवसापासून बीड जिल्ह्यात बिबट्याची दहशत पसरलेली आहे. सुरूवातीला बिबट्या की तडस अशी चर्चा होती. परंतू बिबट्या असल्याचा पुरावा मिळत नसल्याने वन विभाग फक्त तक्रारी ऐकून तक्रारदारांची समजूत काढण्यासाठी घटनास्थळी जावून भेट घेत असे. बिबट्या असल्याच्या तक्रारी असतांनाही पुराव्याअभावी वन विभागाला काहीही ठोस पाऊले उचलता येत नव्हती. त्याचाच परिणाम आज जिल्ह्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून तीन निष्पाप बळी त्या बिबट्याने घेतले आहेत. तरी बिबट्या अद्यापही वन विभागाच्या जाळ्यात अडकलेला नाही. विशेष म्हणजे बिबट्या पुर्व, पश्‍चिम, दक्षिण, उत्तर या चोही दिशेने संधी साधून हल्ले करतांना दिसत आहे. म्हणून नरभक्षी बिबट्या एकच आहे की बिबट्याची संख्या जास्त आहे हे पण अद्याप समजून आलेले नाही. गेल्या दोन दिवसापासून ड्रोन कॅमेर्‍याच्या माध्यमाने बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असतांनाही तो ड्रोनमध्ये दिसून आलेला नाही. बिबट्याचे आगमन जिल्ह्यात कसे झाले? नेमके हे बिबटे कोठुण आले? असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत असतांना दै.रिपोर्टरच्या प्रतिनिधीने आष्टी तालुक्यात जावून घटनास्थळी पाहणी केली. त्यातून अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळाली असून लॉकडाऊनपुर्वीच या बिबट्याचे आगमन बीड जिल्ह्यात झाले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. परंतू त्यावेळी बिबट्याच्या भितीने रानडुकरे पळून गेल्याचे समजल्यानंतर त्या परिसरातील शेतकरी खुष झाले होते. परंतू हाच बिबट्या आज खूनी खेळ खेळत आहे. या बिबट्याने आत्तापर्यंत तीन निष्पापाचे बळी घेवून चार ते पाच जणांना जखमी केल्याचे समोर आलेले आहे. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घटनास्थळी भेट देवून सर्व पाहणी केली. वन मंत्री यांच्याशी चर्चा करून बिबट्याला ठार मारण्याची परवानीगही मागविण्यात आलेली आहे. जिल्हा प्रशासन, वन अधिकारी स्वत: घटनास्थळी तळ ठोकून आहेत. बिबट्या असल्याची किंवा दिसल्याची फोन कॉल आल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी वन पथक पोहचून पाहणी करतांना दिसतात. परंतू आत्तापर्यंत फक्त फेक कॉलच आलेले आहेत. यामुळे वन विभागाची चांगलीच दमछाक होत असून अफवांवर विश्‍वास न ठेवता वनविभागाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.
लॉकडाऊनपुर्वी वनविभागाच्या कर्मचार्‍यांना माहिती मिळाली की, आष्टी तालुक्यातील कडा परिसरात शिरापुर गावाजवळ बिबट्या दिसून आलेला आहे. या संदर्भात वन विभागाच्या कर्मचार्‍याने संबंधित परिसरात पाहणी केली. काही संशयास्पद बिबट्या असल्याच्या खुणाही भेटल्या. यासंदर्भात शिरापुर परिसरात ग्रामस्थांनी बिबट्या असल्याचे सांगितले व या बिबट्यामुळे आमच्या शेतात रानडुकरे येत नाही अशा प्रकारे आनंद व्यक्त केला. परंतू याच बिबट्याला त्या परिसरात ज्या वेळेस खायला मिळाले नसावे म्हणून तो बिबट्या रानडुकराच्या शोधात पुढे-पुढे येत गेला आणि नगर जिल्ह्यातून आलेला बिबट्या बीड जिल्ह्यात पोहचला. बिबट्याचे आगमन लॉकडाऊनपुर्वीच झाले होते. ज्यावेळी लॉकडाऊन लागले त्यावेळी सर्व प्रकारची वाहने बंद होती, रस्ते सुनसान पडली होती. कोरोनाच्या भितीने शेतातील कामेही बंद होती. याचा फायदा घेत बिबट्या जिल्ह्यात आल्याचे हे पण कारण आहे. त्याचवेळी या बिबट्यावर वन विभागाने लगाम लावली असती तर आज बिबट्याने धुमाकूळ घातलेला नसता. आष्टी तालुक्यात बिबट्या असला तरी जिल्ह्यातील इतर तालुक्यातही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या फक्त चालत असला तर रात्रभरातून २५ ते ३० किलोमीटर चालतो. त्याने जर पळ काढला तर ७० ते ८० किलोमीटरचे अंतर तो पार करू शकतो. यातच बिबट्या चारही दिशेने असल्याचे समजून येते. आष्टी तालुक्यातील सुर्डी गावात सर्व प्रथम बिबट्याने हल्ला करून पंचायत समिती सदस्य पतीवर हल्ला करून बळी घेतला. दुसर्‍यादिवशी या बिबट्याने किन्ही गावात एका दहा वर्षीय मुलावर हल्ला करून त्याचा बळी घेतला. दरम्यान या बिबट्याने मायलेकरावर हल्ला करून त्यांना जखमी केले. ही घटना ताजी असतांनाच रविवारी रात्री जोगेश्‍वरी पारगाव गावात हल्ला करून एका महिलेचा बळी घेतला. बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरू असून त्या परिसरात भयंकर दहशत पसरलेली आहे. या संदर्भात ग्राऊंड रिपोर्टींग करण्यासाठी रिपोर्टरच्या टीमने घटनास्थळी जावून पाहणी केली. तब्बल चार तास वन विभागाच्या कर्मचार्‍यांसोबत पिंजरे लावण्यासाठी वनात फिरून पाहणी केली. यावेळी वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी रिपोर्टरच्या प्रतिनिधीच्याही हातात दंडुके दिले. गेल्या पाच दिवसापासून वनविभागाचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता उपाशी राहून कर्तव्य पार पाडतांना दिसत आहे. आ.सुरेश धस यांनी वनात जावून तेथील काही कर्मचार्‍यांच्या जेवनाची व्यवस्थाही केली होती. कडाक्याच्या थंडीत वनविभागाचे कर्मचारी रात्री अपरात्री वनात फिरतांना दिसतात. सुरक्षेच्या नावावर त्यांच्या हातात फक्त दंडुके असून त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवरच दिसून येत आहे. रिपोर्टरची टीम वनात आलेली पाहून वन विभागाचे कर्मचारी शाम सिरसट, रामराव सोनकांबळे, बाबासाहेब मोहळकर, सातपुते यांनी आश्‍चर्य व्यक्त करून आमचे मनोबल वाढले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. विशेष म्हणजे वनाधिकारी तेलंग स्वत: आष्टी तालुक्यात तळ ठोकून असून विविध जिल्ह्यातील विविध पथके बिबट्याचा शोध घेत असल्याचे दिसून आले. किन्ही गावात दहा वर्षीय मुलावर हल्ला झाला त्या परिसरात भयंकर दहशत पसरलेली असतांना त्या ठिकाणी रिपोर्टरच्या टीमने जावून पाहणी केली असता अत्यंत भयंकर परिस्थिती त्या गावाची दिसून आली. या संदर्भात रिपोर्टरची टीम आष्टी तालुक्यात दाखल होण्यापूर्वी कोतन येथील समाजसेवक नितीन घोषीर पाटील यांनी मोलाचे सहकार्य करून रिपोर्टरच्या टीमला बिबट्या असलेल्या घटनास्थळी जाण्यासाठी मदत केली. तसेच नितीन पाटील हे गावातील सर्वांनाच वेळेवर मदत करत असल्याने त्यांच्या नावाची चर्चा गावात असते.

बालकांनी स्वत:ला कोंडून घेतले
किन्ही गावात दहा वर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेल्यानंतर त्या गावात नरभक्षी सन्नाटा पसरलेला दिसून आला. घरात व्यक्ती असूनही दिवसाढवळ्या दार बंद दिसून आली. बराच वेळ किन्ही गावात फिरल्यानंतर मयत बालकाचे चुलत आजोबा मिळून आले. त्यांनी या संदर्भात थोडीफार माहिती दिली. एकंदरीत बोलतांनाही ते लोक घाबरत होते. एका महिलेला या संदर्भात विचारना केली असता घटना घडलेल्या ठिकाणाजवळील काही लोक घर सोडून गेल्याचेही सांगितले. तसेच घटना घडल्यापासून गावातील काही बालकांनी धास्ती घेवून स्वत:ला कोंडून घेतले होते. याबाबत रिपोर्टरच्या प्रतिनिधीने त्यांच्या घरी जावून त्या बालकांची भेट घेतली व त्यांना दिलासा देवून त्यांच्यासोबत मनोरंजन केले. तसेच गावात पाच वाजल्यानंतर नरभक्षी सन्नाटा पसरत असून पाच वाजल्यानंतर गावातील कोणीही व्यक्ती घराचे दार उघडत नाही. रात्रभर जीव मुठीत घेवून जगण्याची वेळ या ग्रामस्थांवर आली असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सर्वस्तरावरून होत आहे.

पीटलं भाकर आणि दंडुके
गेल्या पाच दिवसापासून वन विभागाचे कर्मचारी वनात फिरून बिबट्याचा शोध घेत आहेत. विभागीय वन परिक्षेत्र अधिकारी तेलंग हे स्वत: वनात घटनास्थळी भेट देत असल्याने कर्मचार्‍यांचे मनोबल वाढलेले दिसून येत आहे. हे कर्मचारी २४ तास वनात फिरून पिटलं भाकर खावून आपले कर्तव्य पार पाडतांना दिसतात. विशेष म्हणजे त्यांना पिण्याच्या पाण्याची सोयपण नसते. हातात दंडुके घेवून हे कर्मचारी या वनातून त्या वनात किंवा एखादा कॉल आल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी जावून पाहणी करणे. विशेष म्हणजे हे कर्मचारी रस्त्याने हातात दंडुके घेवून डफडी वाजवत चलतात. कारण की त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्‍न वनात निर्माण होतो. ज्या अर्थी हे कर्मचारी हातात दंडुके घेवून डफडी किंवा काही आवाज करून बिबट्याचा शोध घेत असतात तर तो बिबट्या दिसण्याऐवजी डफलीच्या आवाजाने पुढे जाणार हे मात्र नक्की की या आवाजाने बीड जिल्ह्याच्या बाहेर इतर जिल्ह्यात हा बिबट्या पोहचू शकतो.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!