परळी वैजनाथ | ऑनलाईन रिपोर्टर
परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरण प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अल्पावधीत उलगडा करत अपहृत तुकाराम पंढरीनाथ मुंडे यांची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हे अपहरण करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम पंढरीनाथ मुंडे (वय 54, रा. सांगम, ता. परळी) यांचे 4 जून रोजी पहाटे परळी औष्णिक विद्युत केंद्र परिसरातून अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बेंटवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची छाननी करून आरोपींनी वापरलेल्या वाहनाचा मागोवा घेण्यात आला. या तपासातून पोलिसांचे पथक अमरावतीपर्यंत पोहोचले.
तपासात अपहृत तुकाराम मुंडे यांना अमरावती जिल्ह्यातील हिंगणघाट परिसरात डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत सोडून दिल्याचे समोर आले. आरोपींनी पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हे अपहरण केल्याचेही निष्पन्न झाले.
या प्रकरणात सचिन नारायण वंजारे, संतोष नारायण वंजारे (दोघे रा. परळी), अल्केश विष्णुजी अवजाडे आणि शुभम राजू पिंपळकर (दोघे रा. अमरावती) यांची नावे तपासात पुढे आली. पोलिसांनी प्रथम संतोष वंजारे याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून संपूर्ण कटाचा उलगडा झाला. त्यानंतर नागपूर, मध्यप्रदेश, राजस्थान आणि दिल्ली येथे शोधमोहीम राबवत उर्वरित आरोपींनाही अटक करण्यात आली.
सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून परळी ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.





