कंत्राटी भरती, पाण्याचा प्रश्न, कायदा व सुव्यवस्था, ड्रग्ज माफिया प्रकरण आणि गारपीट नुकसान अधिवेशनात गाजणार
बीड (रिपोर्टर): राज्य विधिमंडळाचे अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार की, 11 डिसेंबरपासून? याबाबत गोंधळ असताना अखेर आज अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली असून 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार्या अधिवेशनात अनेक मुद्यावरून वादळे निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. राज्यात अनेक प्रश्नांवरून ‘सरकार विरुद्ध सर्वसामान्य जनता’ नव्हे नव्हे तर ‘सरकार विरुद्ध मंत्री’ असेही वातावरण दिसून येत असल्याने अंतरवली सराटीतील लाठीमार, बीडमधील जाळपोळ, दुष्काळजन्य परिस्थिती, कंत्राटी भरती, पाण्याचा प्रश्न, ड्रग्ज माफिया प्रकरण व नुकतेच झालेल्या गारपीटीने शेतकर्यांचे नुकसान हे विषय अधिक आक्रमकतेने मांडले जाण्याची दाट शक्यता आहे.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून वारंवार होत होती. त्यानुसार आता राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 7 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. 20 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. तसेच, 19 डिसेंबर रोजी पुन्हा कामकाज सल्लागार समितीची अधिवेशनात बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, विधिमंडळाच्या मुंबईत झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नागपूरचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात अशी चर्चा सुरू झाली, की अधिवेशन 11 डिसेंबरपासून सुरू होईल. 11 डिसेंबरपासून अधिवेशन घेतले तर पहिला दिवस शोकप्रस्तावात जाईल. दुसर्या दिवशी आरक्षण आदी विषयांवर गोंधळ होण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रत्यक्ष अधिवेशन 13 डिसेंबरपासून सुरू होईल आणि 20 डिसेंबरला अधिवेशन संपविले तर केवळ आठ दिवसांचे अधिवेशन होईल. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम संपून अखेर 7 तारखेपासून अधिवेशन सुरू होत आहे. राज्यात या सहा महिन्यांच्या कालखंडात अनेक घटनाक्रमे घडली आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत सराटी अंतरवलीत पोलिसांनी केलेला लाठीमार, त्यानंतर बीडमध्ये झालेली जाळपोळ, पोलिसांनी घेतलेली बघ्याची भूमिका अधिवेशनात चांगलीच गाजणार आहे. ओबीसींचं नेतृत्व करताना शिंदे मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारविरोधात केलेले भाष्य यासह मराठा आंदोलकांना शब्द देऊनही आंदोलकांची होत असलेली धरपकड या अधिवेशनात हे प्रश्न लक्षवेधी ठरणार आहेत. दुसरीकडे अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेली शेती, कंत्राटी भरती प्रकरण, पुण्यातील ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण, राज्यातली दुष्काळजन्यस्थिती अशा अनेक मुद्यांवरून अधिवेशनात गदारोळ उडण्याची दाट शक्यता आहे.











