रानडुकरांच्या व हरणांच्या धुमाकूळाने शेतकरी त्रस्त!
दिंद्रुड (रिपोर्टर) धारुर तालुक्यातील चिखली येथील शिवारात रानडुकरांनी धुमाकूळ घातला आहे.अनंत रुस्तुमराव काशिद वय वर्षे 50 या शेतकर्यावर रानडुकराने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे.
अनंत काशीद हे बुधवारी पहाटे शेतातील पिकाला पाणी देत असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या हाताची बोटे,पायावर व शरीराच्या इतर भागावर इजा केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वराती शासकीय रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. विद्युत महावितरणच्या वेळी-अवेळी लोडशेडिंगमुळे शेतकर्यांना रात्री-बेरात्री जिवाची पर्वा न करता पिकाला पाणी द्यावे लागते. चिखली शिवारातील पळसाडी, कानोबा ते जळक्या पर्यंत अशा संपूर्ण शिवारात रानडुकरांचा व हरणांचा उपद्रव वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. हरणांच्या व रानडुकरांच्या कळपाने शेती पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.तरी चिखली शिवारातील रानडुकरांचा व हरणांचा वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी चिखली ग्रामस्थ व शेतकर्यांकडून होत आहे.