बीड (रिपोर्टर): लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात राजकीय वातावरण अधिक तापलेले असताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. आज जयदत्त क्षीरसागरांनी आपल्या समर्थकांची बैठक बोलवली असून या बैठकीनंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आपली भूमिका ठरवणार आहेत. विशेष म्हणजे या बैठकीच्या व्यासपीठावर रविंद्र क्षीरसागर आणि हेमंत क्षीरसागर यांची उपस्थिती प्रामुख्याने दिसून आली.
बीड शहरातल्या मोंढा भागात असलेल्या विश्वदत्त लॉन्समध्ये ही बैठक सुरू आहे. बीड विधानसभा मतदारसंघासह जिल्हाभरातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थिती दर्शविली आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी, आपआपली भूमिका व्यासपीठावरून स्पष्ट करतआहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांच्यात काट्याची टक्कर होत आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागरांच्या भूमिकेकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. क्षीरसागर कुठल्या पारड्यामध्ये भूमिका टाकतात याबाबत उत्सुकता निर्माण झालेली असून बैठक सायंकाळी चार वाजेपर्यंत चालण्याची शक्यता आहे. बैठकीनंतरच क्षीरसागर आपली भूमिका स्पष्ट करतील.










