पाठलाग करून पोलिसांनी घेतले ताब्यात
अहमदनगर (रिपोर्टर): महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरून पळ काढणार्या महिला गुन्हेगारांना श्रीरामपूरच्या पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतले. सदरील या गुन्हेगारांकडून 17 लाख 77 हजाराचे दागिने जप्त करण्यात आले आहे. हे सर्व गुन्हेगार बीड येथील आहेत.
नेवासा-श्रीरामपूर रोडवर पाठलाग करत महिला टोळीला अटक करण्यात आली. आसराबाई ऊर्फ लक्ष्मी ऊर्फ आशाबाई तुकाराम पवार (वय 55, रा. बार्शी नाका, जि. बीड), सुनीता योगेश जाधव (वय 25, रा. गांधीनगर, नाळवंडी नाका, मोहटा देवी मंदिराजवळ, ता. जि. बीड), वसंत विश्वनाथ मुंजाळ (वय 38, धंदा- मेकॅनिक, एस.टी. डेपो बीड, रा. हिरापूर, ता. गेवराई, जि. बीड), जुबेर रज्जाक पठाण (वय 29, रा. मुन्नावर मस्जिद, तेलगाव नाका, ता. जि. बीड), कैशल्या सर्जेराव गायकवाड (वय 52, रा. नाळवंडी नाका, जि. बीड), कमल विठ्ठल जाधव (वय 53, रा. नाळवंडी नाका, खडी मशीनजवळ बीड), सखुबाई सखाराम कुन्हाडे (वय 40, रा. माऊलीनगर गेवराई, जि. बीड), गवळण पांडुरंग गायकवाड (वय 35, रा. उकंडा, ता. पाटोदा, जि. बीड), शालनबाई लक्ष्मण जाधव (वय 55, रा. नाळवंडी, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
राहुरी कृषी विद्यापीठ येथील प्राध्यापिका धनश्री हंबीरराव सरनौबत या मैत्रिणीला भेटण्यासाठी श्रीरामपूर येथे आल्या होत्या. त्या परत जाण्यासाठी श्रीरामपूर बसस्थानकात आल्या. बसमध्ये बसत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण चोरट्याने चोरून नेले होते. याबाबत श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तांत्रिक विश्लेषणात या गुन्ह्यात स्कॉर्पिओ (एमएच 12, जी. एफ 5637) चा वापर झाल्याचे समोर आले. ही स्कॉर्पिओ नेवासा येथून श्रीरामपूरकडे येत आहे, अशी माहिती श्रीरामपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी हरेगाव फाटा येथे नाकांबदी लावली. सदरची स्कॉर्पिओ येताना पोलिसांना दिसली. चालकाने श्रीरामपूरच्या दिशेने स्कॉर्पिओ पळवली. मोठ्या शिताफीने पोलिसांनी श्रीरामपूरजवळ चारचाकी ताब्यात घेऊन महिला टोळीला अटक केली.