गेवराई (रिपोर्टर): कोर्टाने आदेश दिल्यानंतरही नगरपालिकेने रुजू करून न घेतल्याने डिप्रेशनमध्ये जात न.प. कर्मचारी आजारी पडला आणि त्या आजारात तो व्हेंटीलेटरवर गेल्यानंतर परवा न.प.ने त्याला रुजूचा आदेश दिला. मात्र दुर्दैवाने आज त्या कर्मचार्याचा मृत्यू झाल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी सदरील कर्मचार्याचा मृतदेह थेट नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांच्या दालनासमोर आणून ठेवल्याची घटना आज गेवराई शहरात घडली तर दुसरीकडे गेवराई तालुक्यातल्या सुशी गावात स्मशानभूमी नसल्याने अटॅकने मृत्यू झालेल्या इसमाचा मृतदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून ठेवल्याची खळबळजनक घटना घडली असून या दोन घटनाक्रमाने गेवराई तालुका प्रशासन हादरून गेले आहे.

याबाबत अधिक असे की, गेवराई नगरपालिकेत स्वच्छता विभागात काम करणारे सोमनाथ लक्ष्मण राऊत (रा. नगरपरिषद कॉलनी गेवराई, वय 50 वर्षे) यांना 1.6.2020 रोजी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून सोमनाथ हे आपल्याला रुजू करून घेण्यात यावे यासाठी नगरपालिकेत चकरा मारत होते. न.प. रुजू करून घेत नसल्याचे पाहून त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने नगरपालिकेस संबंधित कर्मचार्यास रुजू करून घेण्याबाबत आदेशही दिले होते. मात्र न्यायालयाचे आदेश असतानाही न.प. संबंधित कर्मचार्यास रुजू करून घेत नव्हती. यामुळे ते तणावात गेले आणि त्यातून ते आजारी पडले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होत चालल्यानंतर परवा 19.12.2023 रोजी नगरपालिकेने त्यांना रुजू होण्याबाबत पत्र दिले. मात्र दुर्दैवाने आज त्यांचा मृत्यू झाला. सोमनाथ राऊत यांचा मृत्यू हा केवळ गेवराई नगरपालिका प्रशासन व्यवस्थेमुळेच झाला, असा आरोप करत संतापलेल्या नातेवाईकांनी आज सकाळी अकरा वाजता त्यांचा मृतदेह न.प.मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर आणून ठेवला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. नगरपालिकेचे कामकाज दुपारपर्यंत ठप्प झाले होते. दुसरीकडे गेवराई तालुक्यातील सुशी गावात स्मशानभूमी असल्याने गेल्या पाच तासांपासून मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. सुशी येथील तुळशीराम आश्रुबा कलेढोण यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी सुशी गावात स्मशानभूमी नाही. गावातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ते ते कुटुंब स्वत:च्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करतात. मात्र तुळशीराम कलेढोण यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ते लोक ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करायचे तेथे गेले असता गावकर्यांनी अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला. म्हणून शेवटी तुळशीराम यांचा मृतदेह नातेवाईकांनी थेट ग्रामपंचायतसमोर आणून मांडला. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत मृतदेह ग्रामपंचायतसमोरच होता. घटनास्थळावर तलाठी , मंडल अधिकारी आणि पोलीस दाखल झाल्याचे समजते.











