धारूर (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली असून नराधम बापाने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. सदरील मुलगी 7 महिन्यांची गरोदर असून तिच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, बुधवारी रात्री धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली असून नात्याला काळीमा फासणार्या नराधम बापाला गुरुवारी सकाळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय पीडित मुलीची आई 7 ते 8 महिन्यांपूर्वी बाहेर गावी गेलेली असताना दारूच्या नशेत नराधम बापाने मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलगी 7 महिन्यांची गरोदर असून तिच्यावर अंबाजोगाई च्या स्वराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवार (दि.7) रोजी रात्री धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून नराधम बापाला गुरुवारी सकाळी पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरणाचा तपास पिंक पथक पो. उप. निरीक्षक श्री शेळके करत असून या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.












