बीड, (रिपोर्टर)ः- थेट वाहतुक व द्वारपोच योजनेतील शासन निर्णयात शुध्दीपत्रक काढणे व त्यासोबत नियमित आणि थकीत मजुरी मिळावी यासाठी शासकीय धरणे गोदामातील हमालांनी 17 दिवसांपासुन धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र अद्यापही या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतलेली नाही. 17 दिवसांपासुन हमाल धरणे देत असतांनाही या विषयी सोडवणूक करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कुठल्याच हलचाली होत नसल्याने आता जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
शासकीय धान्य गोदामातील हमालांच्या थकीत मजुरी नियमित मजुरी, आनंदाचा शिधा किटची मजुरी प्रलंबीत आहे. त्याशिवाय इतरही काही मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या माध्यमातून शासकीय धान्य गोदामातील हमालांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. याला 17 दिवस उलटले आहेत. मात्र अद्यापही प्रशासन हमालांच्या मागण्यांवर लक्ष द्यायला तयार नाहीत. महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या माध्यमातून उपाध्यक्ष राजकुमार घायाळ यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. आतापर्यंत या आंदोलनास विविध राजकीय पुढार्यांनी भेटी दिल्या व त्यांच्या अडचणी समजुन घेतल्या. माथाडी मंडळाच्या निरिक्षकांनीही प्रश्न समजुन घेतला मात्र या प्रश्न सोडवणुकीच्या दुष्टीने कुठल्याच हलचाली होत नसल्याने आता जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा राजकूमार घायाळ यांनी दिला आहे.












