गणेश सावंत-9422742810

धैर्य ठेवून संघर्ष करत यशाची पताका फडकविणारे आणि गाथा लिहिणार्या महाराष्ट्रात स्वाभीमान हरपलाय का? दिल्ली तक्तासमोर कधी न झुकणार्या महाराष्ट्राला स्वार्थाच्या करकेने ग्रासलय काय? नितीमत्ता आणि निष्ठेसाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार्या मराठी माणसाच्या रक्ताचे पाणी झाले काय? असे एक ना अनेक प्रश्न महाराष्ट्रातील वेगवेगल्या पक्षांच्या फुटीरवादी नेत्यांवरून उपस्तित होत असताना ना खाऊँगा ना खाणे दुँगा म्हणणार्या ‘सत्यवादी’ छप्पन इंचाच्या छातीला घोटाळेबाजांच्या कवचकुंडलांची गरज का पडतेय? असे एक ना अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्रातल्या जनतेला पडत असून फुटीरवादी नेत्यांसह अगोदर भ्रष्टाचारी म्हणत स्वत:च्या पक्षात आले की, शिष्टाचारी संबोधणार्या भाजपाचेही लक्तरे लोक आता वेशीला टांगत आहेत.

विषयही तसाच आहे. सत्तर हजार करोह रुपयांचा घोटाळा करणारे जेलमध्ये जाणार, असे दस्तुरखुद्द ना खाऊँगा ना खाणे दुँगा म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या मातीतच म्हटले होते. सिंचन घोटाळा हा सर्वोच्च घोटाळा असल्याचे त्यांनी म्हटले होते. महारोट्रातल्या काका-पुतण्याचे आता काही खरे नाही, असे महाराष्ट्राला आणि देशाला भासवले होते, मात्र अवघ्या दोन महिन्यात अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडली आणि भाजपाला जोडली. तिते 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा संपुष्टात आला. तात्वीकरित्या नाही अथवा कुठल्याही परिस्थितीत अजित पवारांना भाजपात घेणार नाही, म्हणणारे फडणवीस तोंडघशी पडले. एकीकडे अजित पवारांच्या भाजप संलग्नतेवर भाजपाचा कार्यकर्ताच नव्हे तर मतदार उघड चर्चा करत असताना ज्या अशोक चव्हाणांना आदर्श घोटाळ्यापासून गुत्तेदारापर्यंतच्या उपमा देण्यात आल्या त्या अशोक चव्हाणांनाही भाजपाने आपल्या पदरात घेण्याचे ठरवले.

अशोक चव्हाणांचे सर्व घोटाळे भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघाले काय? यावरही चर्चा होत आहे. आता महाराष्ट्रामध्ये विरोधक नावाला उरणार आहेत की नाही? हा एकीकडे प्रश्न असताना महाराष्ट्राचा स्वाभीमान उरात बाळगणारे महाराष्ट्रात कोणीच नाही का? हा सवालही आता उपस्थित करावासा वाटतो. सत्ताकारण करताना विरोधकांशी जवळीक महत्वाची परंतु इथे थेट ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होतायत त्याच लोकांना भाजप स्वीकारत असल्याने त्याचे पडसाद भाजपाच्या मतदारांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये उमटताना दिसतायत? सत्यवादी म्हणवून घेणार्या भाजपासह महाराष्ट्रातील सर्वच पक्षांच्या नेत्यांवर अविश्वासाचा शिक्कामोर्तब झाल्याने सर्वसामान्यांना हमाम मे सब नंगे दिसू लागेत. गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्रातलं राजकारण पाहितलं तर हे राजकारण नसून राजकीय व्याभीचाराचं तोरण असल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे. इथे महाराष्ट्राला स्वराज्याचं तोरण बांधलेलं माहित आहे, स्वाभीमानाचं तोरण बांधलेलं माहित आहे मात्र लाचारीचं आणि स्वाभीमानाचं तोरण या पाच वर्षामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षातील मोठ मोठया नेत्यांनी बांधलं. तर भाजपाने लोकसभेच्या निवडणुकीत विजयाचं पिक काढण्यासाठी फोडाफोडीचं आदर्श सिंचन केलं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजप पिचाडीवर आहे हे गेल्या दोन-अडीच वर्षापासून जसेच भाजपाच्या दिल्ली तक्ताला माहित झाले तसे दिल्ली तक्ताने महाराष्ट्रावर ईडी, सीबीआय सारखे आपले सरदार पाठवले. या सरदारांसोबत लाखोंचे सैन्य नव्हते मात्र कोटी-कोटी विरोधकांच्या भ्रष्टाचाराचे खलिते नक्कीच होते. त्याच्या जोरावर आधी दगाफटका केल्याच्या आरोपात ठाकरेंची शिवसेना फोडली आणि ती शिंदेंना जोडली. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे तर देशाच्या राजकारणात ज्याच्याकडे चाणक्य म्हणून पाहितलं जातं त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही सुरुग लावला आणि तेथूनही अजित पवारांसारखा मोहरा टिपत राष्ट्रवादी अर्धी केली. आता काल-परवा महाराष्ट्रातली उरलीसुरली काँग्रेस फोडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना भाजपवासी केले. विशेष म्हणजे जे फुटले जे फोडले त्यांच्यावर भाजपाने गेल्या कित्येक वर्षापासून भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र आता लोकसभेत खासदारकीचं पिक काढायचं त्यासाठी सिंचन घोटाळा असो की आदर्श घोटाळा आम्हाला फक्त लोकसभेसाठी आदर्श सिंचन करायचं आणि तेच भाजपाने केलं.












