चौसाळ्यात रस्त्यावर टायर जाळले, धुळे-सोलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी मराठ्यांनी रस्ते रोखले, बीड-परळी महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प, मस्साजोग ते अंबाजोगाई रस्त्यावरही अनेक ठिकाणी रस्ता रोको, बीड-नगर रस्त्यावर ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन,

आष्टी/पाटोदा/माजलगाव/ परळी/गेवराई/वडवणी/ धारूर (रिपोर्टर): मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सग्यासोयर्यांची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनास बीड जिल्ह्यात गावागावात मोठा प्रतिसाद मिळाला. तब्बल दोन ते तीन तास जिल्ह्यातले प्रमुख महामार्ग वाहतुकीसाठी बंद होते. परळी-बीड महामार्गावर, धुळे-सोलापूर महामार्गावर, बीड-औरंगाबाद महामार्गावर, नगर-बीड सह अन्य राज्य रस्त्यांसह स्थानीक रस्त्यांवर मराठे रस्त्यावर उतरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. चौसाळा या ठिकाणी रस्त्यावर टायर जाळण्याची घटना घडली. या व्यतिरिक्त जिल्ह्यात रस्ता रोको दुपारपर्यंत शांततेत झाले.

बीड शहरा नजीक असलेल्या पेंडगाव जवळ जबरदस्त रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे बीड-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक बीडपासूनच काही काळ ठप्प झाली होती. पुढे गेवराई येथेही महामार्गावर रास्ता रोको झाल्याचे पहावयास मिळाले. इकडे बीड-परळी महामार्गावर मौज, वडवणी सह पुढे अन्य ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाले. परळीत ईटके कॉर्नरवर मराठे रस्त्यावर उतरल्याने या ठिकाणी बीड-परळीसह परळी-गंगाखेड हे रस्ते पुर्णत: दोन तास बंद होते. तिकडे माजलगावातही मोठा रस्ता रोको केल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

इकडे ग्रामीण भागात पिंपळनेर, लोणी शहाजानपूर सह आदी भागांमध्ये रास्ता रोको आंदोलन झाले. चौसाळा या ठिकाणी रास्ता रोको करताना आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळले. मस्साजोग ते अंबाजोगाईपर्यंतच्या महामाार्गवर नेकनूर-मस्साजोग, केजजवळील केजडी नदीवर रस्ते रोखून धरण्यात आले. तब्बल दोन ते तीन तास बीड जिल्ह्यातील सर्व महामार्ग आणि छोटे-मोठे रस्ते वाहतुकीसाठी बंद होते. त्यामुळे प्रत्येक रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा पहावयास मिळत होत्या.











