बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे दिंदोडे निघत आहे. दररोज कोठे ना कोठे मोटार सायकलची चोरी, घरफोडी, पाकीटमार, मोबाईलची चोरी यासह मारामारीच्या घटना सुरूच आहेत. अनेक ठिकाणी पोलिसांच्या नाकावर टिच्चून मटका, जुगार, अवैध दारू चक्री सुरू आहे. अवैध धंद्यातून पोलिसांना मोठी कमाई मिळत असल्याने हे अवैध धंदे बंद केले जात नाहीत. सध्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता सुरू आहे. या आचार संहितेचा विचार करता अवैध धंदे बंद असायला हवेत पण एकाही अवैध धंद्या विरोधात कारवाई होतांना दिसुन येत नाही. अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडे अवैध रित्या शस्त्र आढळुन येतात. गुंडावर कठोर कारवाई केली जात नसल्याने आठ दहा दिवसाला गुंड धुमाकूळ घालून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांचा वचक नसल्यामुळेच अवैध धंद्यानी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढल्याचे चित्र दिसुन येत आहे.
नंदकुमार ठाकुर बीडला आल्यापासुन त्यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष काही प्रयत्न केल्याचे दिसुन येत नाही. बीड जिल्हा राजकीय दृष्टया संवेदनशिल आहे. जिल्ह्यामध्ये जेवढे राजकारण होते. तेवढ्याच प्रमाणात अवैध धंद्याचा देखिल सुळसुळाट सुरू आहे. अवैध धंद्यामुळे सर्व सामान्यांचे संसार धुळीस मिळू लागले. अगदी लहान लहान मुले दारूच्या आणि विविध नशेली पदार्थांच्या आहारी जावू लागले. ग्रामीण भागात कुठल्याही ढाब्यावर अवैध रित्या दारू विक्री होते. ही दारू विक्री ग्रामीण पोलिसांच्या आशिर्वादाने होते. गाव पातळीवर दारू मिळत असल्याने मध्यपी दारू पिवून गावात गोंधळ घालतात, मारा मार्या करतात. ढाब्यावाल्याकडून हप्ते ठरलेले असतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. शहराच्या ठिकाणी जुगार मटका सर्रास सुरू आहे. चक्री नावाचा जुगार ही सध्या जोरात सुरू आहे. या अवैध धंद्याबाबत पोलिस प्रशासन गप्प असुन यातून मोठी कमाई मिळत असल्यानेच अवैध धंद्याविरोधात कारवाई करण्यास पोलिस टाळाटाळ करतात. जिल्हा पोलिस अधिक्षकांचे नियंत्रण नसल्यामुळे अवैध धंदे वाढले. सध्या लोकसभेची आचारसंहिता सुरू आहे. कायदा सुव्यवस्थेचा विचार करता अवैध धंद्यासह गुंड प्रवृत्तीच्या विरोधात कारवाई करायला हवी पण तसं होतांना दिसत नाही. आठ दहा दिवसाला गुंड प्रवृत्तीचे टोळके आप आपसात वादावादी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कित्येक गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडे अवैध रित्या शस्त्र असतात. कोबींग ऑपरेशनद्वारे गुंडाच्या घराची झाडाझडती घेतली तर अनेक शस्त्र त्यांच्याकडे आढळुन येतील. पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर नुसतेच गोड बोलून वेळ काढू पणा करत असल्याचे दिसुन येत आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी जिल्ह्याला एक चांगला खमका पोलीस अधिकारी हवा. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.
चौकट
शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्या आढळल्या प्रकरणी बीड पोलीस अधिक्षकांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
मध्यंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची तपासणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रत्येक जिल्ह्याच्या प्रधान जिल्हा न्यायाधिशाच्या अध्यक्षतेखाली केली होती. या तपासणीत काही गंभीर बाबी आढळुन आल्या. शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्या, मुलीच्या शाळा परिसरात कंडोमची पाकीटे आढळुन आलेली आहेत. पोलिसांनी शाळेमध्ये सुरू असलेली अनैतिक काम रोखण्यासाठी साध्या वेशात रात्री छापे टाकणे अपेक्षीत असल्याचे निरिक्षक खंडपीठाने नोंदविले. याबाबत आज बीड आणि धाराशिवच्या पोलीस अधिक्षकांना न्यायालयात व्यक्तीशाहाः हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधिश न्यायमुर्ती रविंद्र घुगे व न्यायमुर्ती आर.एम.जोशी यांनी दिले आहेत.