पंकजा मुंडेंची पाथर्डीत ओपन जीपमधून मिरवणूक
श्रीक्षेत्र मोहटादेवीच्या चरणी नतमस्तक
पाथर्डी (रिपोर्टर): बीड लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल मावशीच्या भूमीत म्हणजे पाथर्डी शहरात आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचं अभूतपूर्व असं स्वागत झालं. फटाक्यांची आतिषबाजी, जेसीबीतून फुलांची उधळण करत अलोट गर्दीच्या साक्षीनं कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. पाच वर्ष संघर्ष केला, आता तुमच्या जीवावर मैदानात उतरले आहे, आशीर्वादाची शिदोरी माझ्या झोळीत टाका असं आवाहन त्यांनी याप्रसंगी बोलतांना केलं.
पंकजाताई मुंडे काल नगर येथे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी मुक्कामास होत्या. खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे यांनी त्यांचं स्वागत केलं. सकाळी नगरहून पाथर्डीकडे रवाना होताना रस्त्यात मेहकरी फाटा, करंजी, देवराई, तिसगाव येथे कार्यकर्त्यांनी त्यांचं मोठं स्वागत केल्यानंतर पाथर्डीत त्यांचं आगमन झालं. इथं त्यांच्या स्वागताला अलोट जनसागर लोटला होता, त्यांची वाजतगाजत ओपन जीपमधून मिरवणूक काढण्यात आली.