स्नेहभोजन, निवडणूक तयारी, शंका-कुशंका यावर चर्चा
बीड/परळी (रिपोर्टर): राज्याचे लक्ष लागून असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या पाठिशी बंधू तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येत असून रात्री नाथ्रा येथे सहा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रमुख लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यासह पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांची महत्वपूर्ण बैठक होत स्नेहभोजन करण्यात आले. या वेळी निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली असून राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांसह लोकप्रतिनिधींना मुंडे बंधू-भगिनींकडून काही सूचना देण्यात आल्या. तर राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकार्यांनी मुंडे बंधू-भगिनींना निवडणुकीला कसे सामोरे जायचे याबाबत सूचना दिल्याचे समजते.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांची प्रचार फेरी पुर्ण होत दुसरी प्रचार फेरी सुरू असतानाही अद्यापपर्यंत प्रतिस्पर्धी पक्षाकडून बीड लोकसभेसाठी उमेदवार देण्यात आला नाही, शरद पवार यांच्या गटाकडून बजरंग सोनवणे की, ज्योतीताई मेटे यावर रवंथ चालू आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे या प्रचारात ताकतीने उतरल्याचे दिसून येते. या वेळेस पंकजा मुंडेंच्या पाठिशी त्यांचे बंधू राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे खंबीरपणे उभे आहेत. रात्री परळी तालुक्यातील नाथ्रा या ठिकाणी राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकार्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला भाजपा नेत्या पंकजा मुंडे, पालकमंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित होते. बीड, आष्टी, गेवराई , केज, माजलगाव, परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधी यांच्यासह महत्वाच्या पदाधिकार्यांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आले होते. बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीला सामोरे कसे जायचे? निवडणुकीदरम्यान कुठल्या मुद्यांना कसे हाताळायचे यासह अन्य विषयांवर चर्चा झाली. सदरच्या बैठकीनंतर जिल्ह्यातली राष्ट्रवादी एकवटत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी सज्ज झाल्याचे सांगण्यात येते.












