बीड (रिपोर्टर): नगरपालिका कधी स्वच्छतेच्या कारणामुळे, कधी रस्त्यामुळे तर कधी रस्त्यावर पडलेल्या कचर्याच्या दुर्गंधीमुळे वादग्रस्त असतानाच उन्हाचा पारा 42 अंश पार गेला असतानाही तब्बल महिनाभरापासून बीड शहरातील नगरनाका, पोलीस कॉलनी, अजमरनगर, आमराई, बालेपीर, हा शहरातील मोठा भाग पाण्यावाचून तब्बल महिनाभरापासून वंचीत आहे.या भागाला एक महिन्यापासून पाणी येत नसल्यामुळे खासगी टँकरचे पाणी घेऊन या भागातील नागरीकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे
.
यावर्षी जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. माजलगाव डॅमला पाणी असतानाही नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि पाणी पुरवठा करणार्या गुत्तेदाराचे लाड केल्यामुळे शहरातील बालेपीर, नगरनाका, शाहूनगर या भागांना पाणी नाही. बीड नगरपालिका शहरातील काही रस्त्यांमुळे तर गल्लीतील कचरा रस्त्यावर येऊन पडल्यामुळे दुर्गंधी पडत आहे. या समस्येचे नगरपालिका प्रशासनाला कधीच काही देणेघेणे नाही. हे सगळे प्रश्न समोर असतानाच माजलगाव डॅममधून शहराला पाणीपुरवठा होत आहे. या पाणी पुरवठा योजनेला मध्यंतरी आलेल्या वादळी वार्यामुळे लाईटचे पोल पडले, तारा तुटल्या हे कारण देत पाणीपुरवठा बंद आहे. मात्र वादळ वारे येऊन दोन दिवस विद्युतपुरवठा अधुनमधून खंडीत होतो. मात्र नगरपालिका प्रशासन आणि पाणीपुरवठा विभाग यांच्यात अनागोंदी आहे. आर्थिक हित जपत यांच्यात समन्वय साधला जात नाही त्यामुळे या भागाचा एक महिन्यापासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.










