मराठा क्रांती मोर्चासह सकल मराठा समाजाची पत्रकार परिषदेत माहिती
बीड (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पुर्वनियोजीत नारायणगडावरील 8 जूनची जाहीर महासभा रद्द करण्याची घोषणा सभेचे आयोजक मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाने केली. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता आणि पाणी टंचाईचे भीषण स्वरुप पाहता सभेसाठी येणार्या लाखो मराठ्यांची पाण्याची व्यवस्था होणार नाही आणि केवळ उन आणि पाण्यामुळे उपस्थितांचे हाल होतील यामुळे सदरची सभा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे संबंधितांनी माध्यमांना सांगितले. त्याचबरोबर पुढील सभेची नवीन तारीख लवकरच घोषीत करणार असल्याचेही म्हटले.
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने आज बीड येथे महत्वपुर्ण पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये सभा रद्दची माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला अॅड. मंगेश पोकळे, अनिल जगताप, दिलीप गोरे, अजित वरपे, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना उपस्थितांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांपासून नारायणगड या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे यांची महासभा घेण्याचे नियोजन होते. त्यादृष्टीने मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांच्यावतीने नियोजनही करण्यात येत होते, परंतु 8 जून ही तारीख येण्यासाठी फक्त 15 ते 20 दिवसांचा कालावधी राहिलेला आहे आणि या वीस दिवसांमध्ये कोणतीही पाण्याची व्यवस्था होणार नाही, या महासभेला राज्यातून आणि देशातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज आणि महिला उपस्थित राहणार होत्या. एवढ्या मोठ्या लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार्या जनसमुदायाला पाणी आणि इतर सोयीसुविधा देणे शक्य नाही त्यामुळे ही 8 जूनची मनोज जरांगे पाटील यांची महासभा रद्द करण्यात येत आहे.
उपोषण न करण्याची केली विनंती
येत्या 4 जून रोजी मराठा समाजाला आरक्षण देताना या शासन आदेशात सगेसोयरे हा शब्द समाविष्ट करावा या व इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे 4 जूनपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. त्यांची तब्येत बघता त्यांनी हे उपोषण करूनये, अशी विनंती काल मनोज जरांगे पाटील यांना मराठा क्रांती मोर्चासह सकल मराठा समाजाने केली आहे.