छत्रपती संभाजीनगर (रिपोर्टर): मराठ्यांच्या जीवावर निवडून येणार्या ओबीसी नेत्यांचे रंग उघडे पडलेत. सगळ्या पक्षातील ओबीसी नेते मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात जे कायद्याने दिलंय ते, त्याविरोधात एकवटलेत. मताचा विचार न करता आरक्षणाचा विचार करतायेत. परंतु मराठा नेते मतांचा विचार करत आहेत. आरक्षणाचा नाही हा फरक त्यांच्यात आणि आमच्यात आहे. आरक्षण हा विषय त्यांच्यासाठी मोठा आहे त्यामुळे मते आणि निवडून येणे त्यांच्यासाठी मोठे नाही. हीच भूमिका सगळ्या पक्षातील मराठा नेत्यांनी घेणं गरजेचे आहे असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. तर दुसरीकडे राज्यामध्ये दंगली घडवण्याचा छगन भुजबळ यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भाजपा, अजित पवार गटातील, शिवसेना शिंदे गट, शरद पवार गट, काँग्रेसचे या सर्व पक्षातील ओबीसीचे नेते एकत्रित आले. कुणाला पक्षाला मोजायलाच तयार नाही. मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही यासाठी हे सगळे एक झालेत. हे मराठा नेत्यांना दिसत नाही का? ते पदाला किंमत देत नाही. पण मराठा नेते पदाला आणि मताला इतकी किंमत का द्यायला लागलेत. मी एकटा पडलोय, मराठ्यांच्या आरक्षणाने बाजूने असल्याने मला सगळ्यांनी घेरलंय मी एकटा पडलोय. सत्ताधारी-विरोधी पक्षातील मराठा नेते बोलत नाही. त्यामुळे मराठा समाजाने एकजूट राहावे. जात संकटात सापडलीय, मराठ्यांची पोरं संकटात आहेत. ताकदीने एकत्र या असं आवाहन आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच 6 जुलैपर्यंत सगळी कामे उरकून घ्या, 6 जुलैला जिथं मराठा जनजागृती रॅलीचं नियोजन केलंय तिथे एकही मराठा घरी न राहता, त्यादिवशी लग्न कार्यालाही जायचे नाही. जिल्हा जिल्ह्यात ताकदीने उपस्थित राहा. आपल्याला घेरलंय, आपली जात संकटात सापडलीय. मी एकटा पडलोय. मी हटत नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही असंही जरांगेंनी म्हटलं.
दरम्यान, शाहीरीच्या माध्यमातून आता तलवारी गंजल्या घासून ठेवा असा इशारा भुजबळांनी दिला तो धोकादायक आहे. त्यांना मराठ्यांसोबत दंगल घडवायची, जातीजातीत तेढ निर्माण करायचे आहे. मराठ्यांनी शांततेत राहावे, आपण आधी सुरुवात करायची नाही परंतु आपणही तयारीनं राहा. मराठा हा कडवट आहे. भीणारा नाही. जर यांनी तसा प्रयोग केला, हत्यारे वाटायचे काम केले, दंगली घडवायचा प्रयत्न केला तर आपण हात बांधून बसायचं नाही, कारण यांच्या हातून आपला एकही मराठा मरता कामा नये. हे राज्य शांत राहिलं पाहिजे. मराठ्यांच्या विरोधात बोलायला भुजबळांनी माणसं पेरली आहेत. भुजबळ चिथावणी द्यायला लागलेत. मराठ्यांनी सावध राहा. आपण एकटेच 50-55 टक्के आहोत. जर तसा प्रयोग झाला तर आमचा नाईलाज आहे. जशास तसं उत्तर देऊ. आम्ही कडवट क्षत्रीय मराठे उत्तराला उत्तर देणार असा गंभीर इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी केला.