सांय दैनिक बीड रिपोर्टर मधील आज दिनांक 22 जुलै रोजी चा विशेष लेख बिनधास्त
गणेश सावंत/9422742810
13 जुलै 1919 साली भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वात वेदनादायी आणि काळी घटना अमृतसरच्या बैसाकीत घडली. क्रुर ब्रिटीश अधिकारी जनरल डायर याने निशस्त्र लोकांच्या सभेवर अंधाधूंद गोळीबार केला. कित्येक भारतीय पांढरतोंड्या इंग्रजाने मारून टाकले. त्या घटनेची आठवण पुन्हा एकदा 2026 च्या 20 जुलैला स्वतंत्र भारताच्या राजधानी दिल्लीत घडलेल्या घटनेवरून झाली. दिल्लीच्या जंतर मंतरवर आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली होती. त्यात विद्यार्थी होते, विद्यार्थीनी होत्या. वयोगट असेल 15 ते 35 वर्षांचे, त्यांच्या डोळ्यात आपलं भविष्य होतं, न्यायासाठी आक्रोश होता, हे सर्व पोरं निशस्त्र राहत भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारातून आंदोलन करत होते. त्या निशस्त्र पोरांवर विद्यार्थ्यांवर पोलीसांनी ज्या पद्धतीने लाठीमार केला, त्यांच्या पाठीवर लाठ्या काठ्या बरसल्या, अनेक पोरं पोरी रक्तबंबाळ झाले हे चित्र सोशलमिडियाच्या माध्यमातून उभ्या देशातल्या घराघरात गेले. तेव्हा प्रत्येक माय आणि प्रत्येक बापाला प्रचंड हादरा बसला. विद्यार्थ्यांना काय हवं होतं, नीट पेपर फुटी प्रकरणात जबाबदारी स्विकारत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा होता. त्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. सरकारने त्याला हिंसेचे गालबोट लावले. पोरांना रोखण्यासाठी लाठीमार केला गेला. तोडफोड झाली, दगडफेक झाली, खरंच हे रोखता आलं नसतं का? आज आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सत्तेतले भक्त नौटंकी म्हणतायत, कुणी त्यांना दहशतवादी ठरवतायत, कुणी म्हणतं ते पोट्टे त्या ठिकाणी नाचगाणे करतायत, कुणी म्हणतं देशविरोधी घोषणा देतायत, होय अशा आंदोलनामध्ये आपली पोळी भाजून घेण्यासाठी काही समाजकंठक आलेले असतात, कुणी अजेंडे घेवून येतात, कुणी झेंडे घेवून येतात, कुणी चुकीच्या घोषणा देतात, पण या आंदोलनामध्ये नीट पेपरफुटीमुळे आपल्या काळजाचा तुकडा गमवलेले ते पालकही आलेले होते. कुठल्याही राजकीय पक्षाचे नसलेले विद्यार्थी तेथे होते. न कुठला झेंडा होता, न कुठले माथ्यावर इबिद लावलेले नव्हते. ते पोरं होते आम्हाला योग्य पद्धतीचं शिक्षण हवं म्हणणारे, परंतू ज्या पद्धतीने पोलीसांनी लाठीहल्ला केला तो उभ्या जगाने तर पाहितलाच परंतू पालकांनी जेव्हा हे पाहितलं तेव्हा अखंड हिंदूस्थानच्या घराघरात सरकार विरोधात प्रचंड संताप आहे. अन्यायाची भावना आहे, हा संताप ही अन्यायाची भावना कोण ऐकणार? पारतंत्र्यात पांढरतोंडे होते, आता स्वातंत्र्यात आपल्याच हक्काचे काळतोंडे असे वागतायत तेव्हा

स्वातंत्र्य नावाची रांड
अजून इथं नांदतच नाही. या स्व. नामदेव ढसाळांच्या ओळीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
विद्यार्थ्यांवर अत्याचाराची मालीका इथे खंडीत होत नाही.
स्वातंत्र्य नावाची रांड कधीच इथं नांदत नाही.
मुकी बहीरी झाली ही वांझ व्यवस्था
आक्रोश तिला दिसत नाही.
माणसे बाटलीत, जातीत वाटलीत.
गर्व आम्हा भारतीय असल्याचा कसा करावा?
हुकूमशाहा सैतान कुठे नेहून पुरावा?
हा संताप आमचा आहेच, तसा तो या देशातल्या विचाराने वांझ नसलेल्या अन् पोरं बाळं असलेल्या प्रत्येक मायबापांचा आहे. 2014 पासून 2026 पर्यंत या देशात 80 ते 90 वेळा पेपरफूटले जात असतील, आठ ते आठरा तास अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं जात असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी आवाजही उठवू नये का? शेकडो हजारो भारतीयांच्या बलीदानातून हा अखंड हिंदूस्थान स्वतंत्र झाला. या स्वतंत्र भारताला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्या संविधानाच्या अधिकारातून या देशाचा मालक हा सर्वसामान्य माणूस आहे. मात्र अशा लोकशाहीप्रधान देशात सत्ताधिश जेव्हा हुकूमशाह वर्तन करतात, तेव्हा स्वतंत्र नावाची रांड तिथे नांदायला तयार नसते. हा जो संताप दिल्लीच्या रस्त्या रस्त्यावर दिसतोय, तो केवळ आणि केवळ मस्तवाल सरकारच्या बेजबाबदार वर्तनाला, बेकायदेशीर धोरणांना एका सरळ रेशेत आणण्याची, या तरुणांची भुमिका आहे तर मग ती चुकीची कशी म्हणावी, इन्क्लाब जिंदाबाद, वंदे मातर्म, जय भीम सारखे नारे देत पोरं पोरी दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करत असतील आणि त्या आंदोलकांना नमो रुग्ण दहशतवादी ठरवत असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी अखंड देश उभा ठाकेल.
पोरींच्या छाताडावर पाय
देतायत. त्यांचे मस्तक फोडतायत. त्यांच्या पार्श्वभागाच्या ठिकाणी दांडू मारतायत हे व्हिडीओ आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलेत, थुँ तुमच्या जिंदगानीवर, जेवढी आमच्याकडून थुँ थूँ केली जातीय तेवढी देशभरातून सरकारची आणि लाठीमार करणार्या त्या गुंडांची थुँ थूँ होतीय. गेल्या 25 दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन दिल्ली तख्ताच्या समोर सुरू आहे. 21 दिवस सरकारच्या एकाही नुमाइंद्याला त्या ठिकाणी जावासं वाटलं नाही. 56 इंच छातीचा आव आणणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिथे बसलेल्या लेकरांची किव आली नाही. जेव्हा ओरिजनल 56 इंच छातीवाले निधड्या छातीचे तरणे ताठे पोर संसदेच्या दिशेने कुच करू लागले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतून बाहेर पडले. संसदेच्या गेटला बंद करावे लागले. त्यापेक्षाही
विदारक सत्य
विद्यार्थी जेव्हा संसदेच्या दिशेने जेव्हा कूच करत होते तेव्हा त्यांना जंतर मंतरवर रोखण्यासाठी सरकारने प्रयास का केला नाही. 21-22 दिवसांचे आंदोलन सुरू होते. त्या 22 दिवसात त्या आंदोलनाची उपेक्षा सरकारने केली. ठिक आहे, परंतू आंदोलन चिघळत आहे ही गोपनीय माहिती सरकारकडे असणार, मग तरीही संसदेपासून 100 फूटापर्यंत आंदोलकांना का येवू दिले, याचा अर्थ सरकार जाणीवपूर्वक हे आंदोलन संसदेपर्यंत आणू पाहत होतं. त्याचं कारण आंदोलकांना धमकवायचं, लाठ्या बरसवायच्या, अश्रुधूराच्या नळकांड्या फोडायच्या, पाण्याचे फवारे मारायचे आणि गरज पडली तर बंदूकीच्या गोळ्या चालवायच्या ही सरकारची भुमिका होती का? हा संशय तेव्हा बळावला गेला जेव्हा संसदेमधला तो फोटो बाहेर पडला, ज्यामध्ये संसदेचे सुरक्षा रक्षक यंत्रणा आंदोलकांच्या दिशेने अक्षरश: बंदुकीचे निशाणे धरून उभे ठाकले होते, हे फोटो अधिकृतपणे देशासमोर आणण्याचे सरकारचे कुठले षडयंत्र? त्या फोटोतून आंदोलकांना भेडवायचा तर प्रकार नव्हता ना? भारतीय संसद भवनाच्या 100 फुटापर्यंत आंदोलक जेव्हा येतात आणि कुठलेही तीन तासानंतरचे आंदोलन रस्त्यावर होते तेव्हा बहूदा ते सरकारला होवू द्यायचे असते. इथे फेरे उलटले अन् सरकारच त्यात गुरफटून गेले. विद्यार्थ्यांची मागणी न्यायीक आहे, सत्य आहे, म्हणून त्या विद्यार्थ्यांना बदनाम करण्याहेतू
भाजपेयींचा नेरेटिव्ह
पसरवण्याचा प्रयत्नही असफल होताना दिसतो. आम्ही गेल्या दोन दिवसांपासून विविध गोदी चित्रवाहिन्यांचे डिबेट पाहत आहोत, भाजपाचे प्रवक्ते तेवढेच विषय मांडत आहेत, तिथे आमूक घोषणा दिल्या, तिथे देशविरोधी बोलले गेले. आमच्या देवाला बोलले, इतके पोलीस जखमी झाले परंतू पोरांची मागणी काय आहे, 21 दिवस त्या पोरांकडे दुर्लक्ष का केलं गेलं? याचं उत्तर दिलं जात नाही. घराघरातून विद्यार्थ्यांची मागणी न्यायीक आहे अशी प्रतिक्रिया आता उमटताना दिसतेय. प्रत्येक मायबापाला आपल्या पोराचं भविष्य महत्त्वाचं असतं. त्याच भविष्याचा गळाघोट सरकार करत असेल आणि त्यानंतर सरकार मधील
भाडेके टट्टू
हा आमचा शब्दप्रयोग नाही. भरविधीमंडळाच्या सभागृहात हा शब्दप्रयोग केला होता, भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हणून आम्हाला तो शब्द इथे आठवला, तो एवढ्यासाठीच जेव्हा पोरांवर पोलीसांकडून लाठीहल्ला केला जात होता, तेव्हा लाठीहल्ला करताना पोलीसांच्या गणवेशात आणि काही साध्या वेशात भाडे के टट्टू पोरांवर तुटून पडले होते. काठी मारण्याची पद्धत जणू पोरांना जीवानिशी त्यांना मारायचं होतं. त्यांनी लहान मुली पाहितल्या नाहीत, महिला पाहितल्या नाहीत, डोक्यात काठ्या मारल्या, मुलींच्या छाताडावर पाय दिले, नव्हे नव्हे तर मुलींच्या पार्श्वभागाला काठ्यांनी डिवचलं असे कित्येक व्हिडीओ सोशलमाध्यमांवर व्हायरल आहेत. गोदी मिडिया हे सत्य दाखवत नाही. परंतू सत्यासाठी, न्यायासाठी आणि हक्कासाठी लढणारे अनेकजण सोशलमिडियाच्या माध्यमातून हे सत्य बाहेर आणतात तेव्हा भाडे के टट्टू दिसून येतात. दिल्ली पोलीसांदेखत हे सर्व प्रकार होत असतांना सरकार जर आंदोलनकर्त्यांना नाव ठेवत असेल तर यांच्यासारखं दळभद्री ते कोणीच नसेल. हा
आंदोलनाचा वनवा
दिल्लीच्या जंतर मंतर वरून दिल्ली शहरभर पसरलाय. पुढे तो अनेक राज्यामध्ये पसरत आहे. हा वनवा क्षमवायचा असेल तर या देशातील शिक्षण पद्धत सुधरावी लागेल. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांसारख्या निष्क्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागेल. विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्याचा आदेश देणारे गृहमंत्री अमित शाह यांना लाठीहल्ल्याची जबाबदारी स्विकारावी लागेल. रक्तबंबाळ केलेल्या लेकरांची दस्तूरखूद्द पंतप्रधानांना माफी मागावी लागेल, कारण विद्यार्थी खरे आहेत. त्यांचं आंदोलन न्यायीक आहे, त्यांची भुमिका स्पष्ट आहे. अन् सरकार जर अजूनही अहंकारात असेल तर सरकारच्या अशा वर्तनाला त्यांचं समर्थन करणारांना त्यांचेच मातापिता
पुत्र झाला
म्हणे रांड
म्हणत हिनवल्याशिवाय राहणार नाहीत. सरकारचे वर्तन एखाद्या चहाड चोरटा सिंधळ दुराचारी, चांडाळासारखे त्या लाठीमारातून दिसून आले. अशा वर्तनाला जगद्गुरू संत तुकोबा आपल्या अभंगातून म्हणतायत-
देखोनि हरखली अंड । पुत्र जाला म्हणे रांड । तव तो जाला भांड । चाहाड चोरटा शिंदळ ॥1॥ जाय तिकडे पीडी लोका । जोडी भांडवल थुंका । थोर झाला चुका । वर का नाही घातली ॥धृपद॥ भूमि कापे त्याच्या भारे । कुंभपाकाची शरीरे । निष्ठुर उत्तरे । पापदृष्टी मळिणचित्त ॥2॥ दुराचारी तो चांडाळ । पाप सांगाते विटाळ । तुका म्हणे खळ । म्हणोनिया निषिद्ध तो ॥3॥
अर्थ आपुल्याला पुत्र झाला म्हणून एक स्त्री मनातून आनंदी झाली ; पण पुढे तो पुत्र भांडखोर, चोर, दुर्वर्तनी निघाला .तो जिकडे जाईल तिकडे लोकांना पीडा देत असे, त्यामुळे लोक त्याला त्रासले होते, त्याच्या आईने मोठी चूक केलि की तिने जन्मतच त्याला मरून टाकले नाही .ज्याच्या देहभाराने भूमि थरथर कापते , जो दुसर्यांना अपशब्द बोलतो, ज्याचे चित्त मलिन व पापी आहे, तो साक्षात कुंभीपाक नरकाचे रूप आहे .तुकाराम महाराज म्हणतात, तो दुराचारी, चांडाळ असून पापालासुधा त्याच्या संगतीत विटाळ होतो, अशा खळप्रवृत्तीचा धिक्कार असो.
आम्हीही लाठीमार करणार्या सरकारचा असाच धिक्कार करू!










