दिल्ली (वृत्तसेवा): केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून सरकारी कर्मचार्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएस मध्ये जाण्यावर घालण्यात आलेली बंदी उठवली आहे. 9 जुलै रोजी केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा अध्यादेश भाजपाच्या मीडिया सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. 1966 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी यासंदर्भात निर्णय घेतला होता. 58 वर्षांपूर्वीची ही बंदी आता उठवण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या मिडिया सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर यासंदर्भातला सरकारी आदेश शेअर केला असून त्यावर सविस्तर पोस्टही लिहिली आहे. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून त्याच दिवशी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे त्यावरून राजकीय खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
काय आहे केंद्राच्या आदेशामध्ये?
केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून सरकारी कर्मचार्यांसाठी जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार सरकारी कर्मचार्यांना सहभाग घेण्यासाठी निर्बंध घालण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या यादीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. 30 नोव्हेंबर 1966, 25 जुलै 1970 व 28 ऑक्टोबर 1980 या तीन दिवशी जारी करण्यात आलेल्या सरकारी आदेशांचा उल्लेख या आदेशात करण्यात आला आहे.