बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून) : मतदारसंघातले रस्ते कसे? लोकांना काय हवे, त्यांच्या अडचणी काय? तेथील शिक्षण, आरोग्याचे प्रश्न काय? शेतकर्यांचे हाल किती? गावात आत्महत्या किती? हे गेले पाच वर्षे विचारायला गावात कोणी आलं नाही, आता विधानसभेची निवडणूक लागते तेव्हा इच्छुकांसह विद्यमानांनी आपआपल्या मतदारसंघातल्या ‘गावाकडे चला’ला अधिक महत्व देत सर्वसामान्य नागरिकांची अस्थेवाईक चौकशी सुरू केलीय. कोणी बांधावर जातय, कोणी घराघरात जावून बैठका घेतय, कोणी मीच कसा चांगला आमदार होऊ शकतो आणि निवडून येऊ शकतो याचे गणित समजून सांगतय. कोणी जातीचा आधार घेतय तर कोणी आपल्याकडे दहा-पाच कोटी रुपये आहेत, आपण खर्च करू हे सांगण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना भेटण्यासाठी मुंबई-दिल्लीवारी करतय आणि इथं प्रत्येकाला आमदार झाल्यासारखं वाटतय.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात एकूण सहा मतदारसंघ आहेत, आमदारकीच्या जागा सहा आहेत मात्र प्रत्येक मतदारसंघात दहापेक्षा अधिक जण आमदार होण्याच्या अभिलाषेपोटी इच्छुक आहेत. एका पक्षाकडून पाच-पाच, आठ-आठ जणांच्या इच्छुकांची बहुगर्दी पहावयास मिळत आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून लोकसभेत लागलेला निकाल आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्याचे होणारे पडसाद पाहता इथे अनेक जणांना पैशाच्या जोरावर आमदार होऊ वाटतय. तर त्यांच्याकडे पैसे नाहीत, ते जणू ‘जंगली रम्मी पे आओ ना महाराज’ च्या जाहिरातीसारखं नशीब आजमावू पाहातायत. बीड मतदारसंघात पंधरापेक्षा अधिक जण वेगवेगळ्या पक्षातून इच्छुक आहेत. तिकडे गेवराईतही प्रमुख पक्षाचे अपक्ष म्हणून तयारी करत आहे तर अन्य पक्षांकडून उमेदवारीसाठी प्रयत्नांची परिकाष्टा करत आहेत. इकडे आष्टी मतदारसंघात भाजपातील अंतस्त: वाद अन् महायुतीतील इच्छुकांची गर्दी लक्षवेधक ठरत आहे. तिथे आपणच कसे सरस हे दाखवण्यासाठी धस-धोंडे-आजबेंपासून दरेकर-तरटे-शिंदेंपर्यंत जो तो कामाला लागला आहे. केजमध्ये विद्यमानांसह ठोंबरे, घाडगे, डॉ.शिंदे, साठेंसह अनेक इच्छुकांची बहुगर्दी आमदार व्हायचय म्हणून बांधा-बांधावर जात आहेत. माजलगावचं विचारू नका, तिथं तर घरागणीस आमदार चर्चेत आहेत. परळीतही सोपं नाही, तिथेही इच्छुकांना वाव आहे, अन् तिथेही लढण्याची अनेकांना खाज आहे, परंतु आज जेवढ्या ताकतीने गावागावात इच्छुक जात आहेत, गेली पाच वर्षे यातील एकही कुठल्या गावात गेला नाही, एखाद्या प्रश्नावर बोंबलला नाही, आंदोलन केले नाही, आता मात्र गावच्या ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत आणि ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या घरापासून मंत्री-मुख्यमंत्र्यांच्या उंबर्यापर्यंत माथे टेकवत आहेत. या सर्व बहुगर्दीत विद्यमान आमदार मात्र मुर्छ्ीत दिसून येत आहेत.