गेवराई, (रिपोर्टर) गेवराई तालुक्यातील सुशी परिसरात एका 35 वर्षीय विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुशीवडगाव येथे संबंधित विवाहित महिला आपल्या घरासमोर उभी असताना काही आरोपींनी तिच्या तोंडावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाच पुरुष आणि एका महिलेने तिचे जबरदस्तीने अपहरण केल्याचा आरोप आहे. अपहरण केल्यानंतर पीडितेला अज्ञात ठिकाणी नेण्यात आले आणि तेथे तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.ङ्गघटनेनंतर गंभीर अवस्थेत असलेल्या महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी बीड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.ङ्गया घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सक्रिय झाली असून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. घटनेमागील नेमके कारण, आरोपींची ओळख आणि गुन्ह्याचे स्वरूप याबाबत पोलीस तपास सुरू आहे. घटनास्थळ आणि परिसरातील पुरावे संकलित करण्याचे कामही सुरू असल्याची माहिती मिळत आहे.ङ्गदरम्यान, एका विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याच्या या घटनेमुळे गेवराई तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. ङ्गअशा प्रकारच्या गंभीर घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत व या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य बाहेर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे.









