कर्जत भागातील 60 एकर जमिनीचे दमानिया दांपत्याचे घोटाळे अन् नितीन चव्हाण यांचे 75 प्रश्न
मुंबई (प्रतिनिधी) – तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व त्यांचे पती अनिश दमानिया यांनी कर्जत वाकोला भागात आदिवासींच्या 60 एकर जमिनी बळकावल्या आहेत. ही बाब 2011 च्या काळातील असून सदर प्रकरणी अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनातील जुने सहकारी नितीन चव्हाण यांनी केलेल्या तक्रारी दाबून चौकशीतून सुटण्याच्या उद्देशाने अंजली दमानिया ह्या सामाजिक कार्यकर्त्या असल्याचा आव आणून ठराविक प्रकरणांमध्ये रस दाखवतात. त्यांना वाचण्यासाठी राजकीय वरदहस्त लाभावा केवळ यासाठीच त्या ठराविक नेत्यांना टार्गेट करतात, असा गौप्यस्फोट इंडिया अगेस्ट करपशन चे कार्यकर्ते व अंजली दमानिया यांचे जुने सहकारी नितीन चव्हाण यांनी एका वृत्त संस्थेस दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
नितीन चव्हाण हे लोकपाल आंदोलनापासून अण्णा हजारे यांचे सहकारी राहिलेले आहेत. याच आंदोलनातून अंजली दमानिया यांनी देखील सामाजिक कार्यकर्त्या म्हणून एन्ट्री घेतली होती. पुढे त्या अरविंद केजरीवाल यांच्या सोबत आम आदमी पक्षात गेल्या.
कर्जत भागात आदिवासींच्या 60 एकर जमीनी बेकायदेशीर मार्गाने बळकावल्या, एवढेच नव्हे तर त्या जमिनी जलसंपदा विभागाकडून एका प्रकल्पासाठी संपादित केल्या जाऊ नयेत यासाठी त्यांनी आदिवासींच्या इतर जमिनी त्या प्रकल्पासाठी संपादित करण्यासाठी तत्कालीन सरकारला आपले राजकीय वरदहस्त वापरून भाग पाडले. याबाबत शासनाच्या विविध यंत्रणांकडे आपण तक्रारी केल्या असून, त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा देखील नितीन चव्हाण यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणात मदत करण्यावरुनच अंजली दमानिया यांनी तत्कालीन मंत्री नितीन गडकरी, अजितदादा पवार यांच्या वरती वेगवेगळे आरोप केले होते, असेही नितीन चव्हाण यांनी म्हंटले आहे.
अंजली दमानिया या आपले काळे कारनामे झाकून ठेवले जावेत, यासाठी ठराविक प्रकरणी ठराविक नेत्यांना सुपारी घेऊन टार्गेट करतात, त्यांचा हेतू साध्य झाला की त्या संबंधित प्रकरणातून एक्झीट घेतात, असा खुलासाही नितीन चव्हाण यांनी केला आहे.
नितीन चव्हाण यांनी आतापर्यंत इडी, मुख्यमंत्री, अँटी करपशन ब्यूरो, शेु यांसारख्या अनेक यंत्रणा कडे याबाबत तक्रारी केल्या असून, एकही तक्रारीवर चौकशी किंवा कारवाई झाली नसल्याची खंत नितीन चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. बीड प्रकरणात ठराविक लोकांना मदत व्हावी, यासाठी अंजली दमानिया यांनी एन्ट्री घेतली, त्या जर सामाजिक कार्यकर्त्या आहेत, तर त्यांनी इथल्या प्रकरणात अधिकारी किंवा अन्य लोकांची जात का काढली? असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला असून, बीड प्रकरणात आपण जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक तसेच पीडित देशमुख कुटुंबीयांना सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा नितीन चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान आपण सामाजिक कार्याचा आव आणून सुपारी घेऊन ठराविक हाय प्रोफाईल प्रकरणी ठराविक नेत्यांना टार्गेट करून आपल्या राजकीय वरदहस्तांचे काम करून देणार्या अंजली दमानिया यांच्या कथित घोटाळ्यांचे, ते घोटाळे दाबण्यासाठी आपला नोकर मकरंद ते आणखी किती लोकांचे बळी दमानिया दांपत्याने दिले या सर्व बाबींचे पुरावे आपल्याकडे असून, आपले दमानिया दाम्पत्याला खुल्या चर्चेचे आव्हान असल्याचेही नितीन चव्हाण यांनी म्हंटले असून, त्यांनी अंजली दमानिया यांच्या विविध घोटाळ्यांच्या अनुषंगाने असलेल्या 75 प्रश्नांचे उत्तरे दमानिया दांपत्याने द्यावेत, असे खुले आव्हान या मुलाखतीच्या माध्यमातून नितीन चव्हाण यांनी दिले आहे.











