मुंबई (रिपोर्टर) ”शिवसेनेतून आज पालापाचोळा उडत आहे, जी पानं गळणे गरजेची आहेत ती गळत आहेत. झाडाकडून सर्व काही मिळाल्यानंतर पानं टवटवीत झाले की, गळुन पडतात; पानगळ होते तेव्हा आपल्याला वाटते की झाडाला काय झाले असेल, पण आठ दहा दिवसानंतर झाड हिरवेगार होतेच. हिंदुद्वेषी घरातच आहेत ते कपाळ करंटे आहेत. हा अशा घणाघात भाजप आणि शिंदे गटावर शिवसेना प्रमूख उद्धव ठाकरे यांनी केला. सामनाला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. त्यांची तडाखेबंद मुलाखत सामनाचे संपादक आणि शिवसेना नते तथा खासदार संजय राऊत यांनी घेतली त्यावेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, आता शिवसेनेच्या झाडाला नवीन कोंब फुटत आहेत. ज्येष्ठ शिवसैनिक येऊन भेटतात. त्यांना संघर्ष काय हे कळलेले आहेत. ते आशिर्वाद देत आहेत. हे आमच्यासाठी महत्वाची बाब आहे. ठाकरे म्हणाले, जेव्हा माझी शस्त्रक्रीया झाली. तेव्हा मला सुटी देताना डॉक्टर म्हणाले की, सर कुठे जायचे मातोश्री की वर्षा मी म्हटलो मातोश्री..मी शुद्धीवर नसलो असतो तरी गुंगीतही मातोश्रीच म्हटलो असतो. मुख्यमंत्रीपद महाराष्ट्रासाठी वैभवशाही पण मला त्याचा मोह नव्हता.
मी गुंगीत असताना काहींची हालचाल वाढली
ठाकरे म्हणाले, मी गुंगीत असताना माझे सरकार पाडले जात होते. तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रिया कुठल्याही डॉक्टरांना विचारल्यानंतर मानेचे धोके गंभीर असतात. अचानक पाच सहा दिवसानंतर सकाळी जाग आली, आळस देताना मानेची हालचाल बंद झाली. तो गोल्डन अवर होता त्यातच माझे ऑपरेशन झाले म्हणून आज मी तुमच्यासमोर उभा आहे. मी बरा व्हावा म्हणून काहीजण देवाची पूजा करीत होते तर मी असाच राहावा म्हणून काहीजण देव पाण्यात ठेवून होते, ती गोष्ट माझ्यासाठी आयुष्यभर आठवणीत होती. जेव्हा माझी हालचाल बंद होत होती तेव्हा काही जणांची हालचाल वाढत होती.
चुक माझी,
गुन्हा माझा
ठाकरे म्हणाले, चुक माझी आहे. गुन्हा माझा आहे की मी शिंदे यांना परिवारातील समजलो. समजा मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केले असते तर त्यांनी वेगळे काय केले असते त्यांची राक्षसी महत्वकांक्षा आहे. त्यांना अजून काय हवे आहे. ते स्वतःला बाळासाहेब मानत आहेत.