बीड, (रिपोर्टर)ः- सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवला जाऊ नये या प्रमुख मागणीसाठी आज डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्ष यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत निषेध केला आहे.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री माननीय अजित पवार यांनी सामाजिक न्याय विभागाचा हक्काचा निधी इतर खात्यात वर्ग केल्याची माहिती मिळत असून अनुसूचित जाती जमाती व आदिवासी यांच्या आर्थिक व शैक्षणिक उत्थानासाठी निर्माण केलेले हे संविधानिक खाते असून, याचा निधी इतरत्र वळवणे हा कायदेशीर गुन्हा होऊ नये, तसेच हा सामाजिक अन्याय आहे. अशा प्रमुख मागणीसाठी आज डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या इतर मागण्यांमध्ये समाज कल्याण खात्याच्या अंतर्गत येणार्या सर्व महामंडळांना लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा, ही या आंदोलनाची दुसरी मागणी होती. व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर्टी या नवीन संस्थेला देखील निधी उपलब्ध करून द्यावा. या सर्व मागण्यांसाठी आज डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या प्राचार्य सुकुमार कांबळे, अजिंक्य चांदणे, यांच्या मार्गदर्शनाखाली बप्पा सोनवने,सुभाष लोणके, केशव लोंढे, राजाभाऊ खंडागळे, बाळासाहेब पोळ, उषा चव्हाण, सुनील पाटोळे, नवनाथ कांबळे, विष्णू अवचार, अमोल सुतार, बाळासाहेब दोडके, साईनाथ आढागळे, चंद्रसेन पाटोळे, आकाश पाटोळे, सुरेश गायकवाड, विजयकुमार पारवे, यांच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.









