बीड (रिपोर्टर): जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी बीड तहसील कार्यालयामध्ये अर्ज करण्यात आले होते. मात्र दिलेले कागदपत्र बोगस असल्याचे आढळून आल्यानंतर या प्रकरणी दोघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकबाल मुन्शी कुरेशी (रा. बलभीम चौक) व फेमुन्नीसा बेगम शेख मैनुद्दीन (रा. मोमीनपुरा) यांनी जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी बीड तहसील कार्यालयामध्ये अर्ज दाखल केला होता. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड देर्यात आले होते. मात्र त्यांच्या कागदपत्रात तफावत आढळून आली. याबाबतची छानणी तहसील विभागाने केल्यानंतर सदरील हा प्रकार बोगस असल्याचे आढळून आले आहे. बीड तालुक्यातील जन्मस्थळ व रहिवासी असल्याचा पुरावा तहसील विभागाच्या छनणीमध्ये आढळून आला नाही. संबंधितांनी दिलेल्या निर्गम उतार्यावर जन्मस्थळ उस्मानाबाद येथील असल्याचे आढळून आले आहे. हा प्रकार बोगस असून या प्रकरणी जगन्नाथ साधू राऊत (ग्राम महसूल अधिकारी, सज्जा बीड बलगुजार) यांच्या फिर्यादीवरून एकबाल कुरेशी व फेमुन्निसा बेगम या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.








