शेतकर्याचे लाखोचे नुकसान
ढेकणमोहा (रिपोर्टर): नाळवंडी रोडकडे जाणार्या रस्त्यालगत असलेल्या एका गोठ्याला अज्ञात इसमाने आग लावल्याने या आगीत दोन शेळ्यांसह दोन बोकड, कडब्याची गंज व शेती औजारे जळून खाक झाल्याची गटना काल रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली. या जाळपोळीत शेतकर्याचे एक लाखापेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात शेतकर्याच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, ढेकणमोहा येथील शेतकरी शंकर श्रीराम थापाडे यांची शेत जमीन गावालगतच्या नाळवंडी रोडकडे जाणार्या रस्त्यालगत आहे. शेतामध्ये त्यांनी गोठा बांधलेला आहे. 10 मेच्या रात्री 12 ते 1 वा.च्या सुमारास त्यांच्या गोठ्याला अज्ञात इसमाने आग लावली. या आगीमध्ये गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्या, दोन बोकड जळून खाक झाले तर कडब्याची गंज आणि शेती औजारे हेही जळून खाक झाले. या जळीत कांडामध्ये शंकर थापाडे यांचे लाखापेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले. थापाडे यांनी या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा. र.नं. 111/2025 कलम 326 एफ, 324 (4) , 325, विएनएस 2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उपनिरीक्षक गर्जे हे करत आहेत.








