दुर्गंधीने नागरीक वैतागले
सिरसाळा (रिपोर्टर):- सिरसाळा येथील जुण्या बसस्थानकाकडे जाणार्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून, यामुळे परिसरात दुर्गंधीचा तीव्र वास येत आहे. या प्रकारामुळे मार्केटमध्ये ये-जा करणार्या नागरिक आणि व्यापार्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, या रस्त्यावर शासकीय आरोग्य केंद्र, मेडीकल सोनार लाईन, फटो स्टुडीओ, खताची,बि बियाणे, सेमेंट फरशी,कलर ची दुकाने आहेत. घाणीमुळे व्यापारी वर्ग व नागरीकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून सिरसाळा येथील मुख्य ममार्केटला जाणार्या रस्त्याच्यावर कचरा साचले आहे. यामुळे या भागात दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक आणि शेतकरी ये-जा करतात. घाणीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लहान मुले आणि वृद्धांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीकडे या समस्येबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत फक्त कर गोळा करते, पण मूलभूत सुविधा पुरवण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया एका स्थानिक व्यापार्याने दिली.
या दुर्गंधीमुळे परिसरातील व्यावसायिकांवरही परिणाम होत आहे. अनेक ग्राहक घाणीमुळे या रस्त्यावरून जाणे टाळत असल्याने व्यवसायावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
नागरिकांनी ग्रामपंचायतीला तात्काळ यावर लक्ष देऊन कचरा उचलण्याची आणि परिसरात स्वच्छता राखण्याची मागणी केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.









