
कारेगव्हाणच्या शाळेत जिल्हाधिकार्यांनी केले मुलांचे स्वागत
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना ड्रेस व पुस्तकांचे वाटप
बीड (रिपोर्टर): दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्ट्यानंतर आजपासून शाळेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे, असे आदेश शिक्षण विभागाने संबंधित शाळांना दिले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांचे आज स्वागत करण्यात आले. बीड तालुक्यातील कारेगव्हाण येथील जि.प. शाळेमध्ये जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना ड्रेस व पुस्तकाचे वाटप करण्यात आले. अडीच लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आज शाळेमध्ये पाऊल ठेवले.
दोन महिन्यानंतर उन्हाळी सुट्ट्या संपल्या. आजपासून शाळेची घंटा वाजली. शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करावा व मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा, असे आदेश शिक्षणाधिकार्यांनी सर्व शाळांना दिले होते. सकाळी आठ वाजल्यापासून शहरी भागासह ग्रामीण भागात लगबग सुरू होती. जिल्ह्यातील अडीच लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आज पहिल्या दिवशी शाळेमध्ये पाऊल ठेवले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड तालुक्यातील कारेगव्हाण येथील जि.प. शाळेमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यामध्ये जि.प.चे प्रभारी सीईओ वासुदेव सोळंके, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी पंचगल्ले, उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, विस्तार अधिकारी तुकाराम पवार, राहुल चाटे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. शाळेच्या पहिल्या दिवशी पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक व ड्रेसचे वाटप करण्यात आले.








