अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, 9 उमेदवार विजयी घोषित

माळेगांव (रिपोर्टर): माळेगांव सहकारी साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी बुधवारी(दि 25) सलग दुसर्या दिवशी देखील सुरु आहे. पहिल्याच निकालात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाजी मारली आहे. पवार यांंनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ’ब’ वर्गातुन दणदणीत विजय मिळवला. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह 9उमेदवार त्यांंच्या गटाचे निवडुन आले आहेत. तर सहकार बचाव पॅनल चे नेते, माळेगावं चे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे पराभूत झाले आहेत. त्यामुळे अजित पवार हे माळेगांवचा गड राखण्यात यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या रुपाने माळेगावला नवा कारभारी मिळाला आहे. तर शरद पवार गटाची पिछाडी कायम आहे.
त्यानंतर त्यांंच्याच गटाचे अनुसुचित जाती व जमाती प्रवर्गातून रतनकुमार भोसले यांना 8670 मते मिळाली, तर विरोधी गटाचे उमेदवार बापुराव गायकवाड यांना 7183 मते मिळाली. भोसले हे 1487 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. मागास प्रवर्गातून नितीन शेंडे यांना 8494 मते मिळाली. तर सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे यांना 7341 मते मिळाली. शेंडे यांचा 1153 मतांनी विजय झाला. भटक्या विमुक्त जाती जमती प्रवर्गातून विलास देवकाते आणि महिला राखीवमधुून संगीता कोकरे आणि ज्योती मुलमुले या विजयी झाल्या आहेत. देवकाते यांचा 2227 मतांनी विजय झाला आहे. बाळासाहेब तावरे, शिवराज राजे जाधवराव, राजेंद्र बुरुगले निवडून आले आहेत. तर विरोधी गटाचे नेते रंजन तावरे पराभूत झाले आहेत.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय भवन बारामती येथे मतमोजणी पार पडत आहे. या मध्ये ब वर्ग प्रतिनिधीची मतमोजणी प्रारंभी झाली ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार होते. प्रथम ब वर्गासाठी मतमोजणी झाली. या वर्गात 99 टक्के मतदान झाले होते. अपेक्षेप्रमाणे सर्व संस्थावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांना 101 त्यापैकी तब्बल 91 एवढी मते पडली तर विरोधी सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांना 10 एवढीच मते मिळाली. अजित पवार गटाचे योगेश जगताप,तानाजी कोकरे, स्वप्नील जगताप,गणपतराव खलाटे, प्रताप आटोळे, सतीश फाळके,अविनाश देवकाते,जयपाल देवकाते,देविदास गावडे हे उमेदवार आघाडीवर आहेत. तर तावरे गटाचे चंद्रराव तावरे,रणजित खलाटे हे दोन उमेदवार आघाडीवर आहेत.












