
गावातील कामात भ्रष्टाचार कारवाईची मागणी
बीड (रिपोर्टर)ः-वांगीच्या ग्रामपंचायत अंतर्गत मांतग वस्ती, पाण्याचे फिल्टर, घनकचरा इत्यादी कामात अनियमीतता असून या प्रकरणी पंचायत समितीकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र याची दखल घेतली जात नसल्याने आज वांगी येथील ग्रामपंचायतीला कुलूप ठोकून कार्यालय समोर हरीभाऊ शेळके यांचे उपोषण सुरू आहे.
वांगी ग्रामपंचायत अंतर्गत मांतग वस्ती पेवल ब्लॉक, तसेच गावातील पाण्याचे फिल्टर, स्वच्छतागृह, घनकचरा यासह आदि कामामध्ये भ्रष्टाचार झाला असून या कामाची चौकशी करावी अशी मागणी हरीभाऊ रावण शेळके यांनी पंचायत समितीकडे केली होती. यासाठी उपोषणही केले होते. त्यावेळी फक्त आश्वासन देण्यात आले होते. कुठलिही कारवाई करण्यात आली नव्हती. कारवाईच्या मागणीसाठी शेळके पुन्हा आजपासून गावातील ग्रा.प.समोर उपोषणाला बसले त्यांनी ग्रा.प.कार्यालयालया कुलूप देखील लावले. ग्रामपंचायत कार्यालयाकडे ग्रामसेवक फिरकत नसल्याचा आरोप शेळके यांनी केला आहे. या संदर्भात गावचे ग्रामसेवक लोमटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी नियमीतपणे कार्यालयात जातो, शेळके उपोषणाला बसले असून त्या संदर्भात चौकशी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.








