
बीडमध्ये वैद्यकीय महाविद्यालय, हॉस्पिटल, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात येणार
पीएचडी करणार्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना 1 लाखाची शिष्यवृत्ती
विधवा महिलांना 50 हजाराचं अर्थसहाय्य
बीड (रिपोर्टर): वक्फ महामंडळाची पुर्वीची स्थिती अत्यंत खराब होती, मात्र मी सदस्य आणि अध्यक्ष झाल्यापासून महामंडळामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. महामंडळाकडे फक्त 27 कर्मचार्यांचा स्टाफ होता. आता 200 पेक्षा जास्त कर्मचारी महामंडळाकडे आहेत. प्रत्येक जिल्ह्यात महामंडळाचे कार्यालय असून आता महामंडळ विकासाच्या दिशेने पाऊल टाकत असून बीड जिल्ह्यात वक्फच्या जमीनीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय, हॉस्पिटल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी दिली आहे. तसेच पीएचडी करणार्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना 1 लाख रुपये व विधवा महिलांसाठी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य महामंडळाकडून दिले जाणार असल्याचे काझी यांनी म्हटले आहे.
वक्फ महामंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. पुढे बोलताना समीर काझी म्हणाले की, चार वर्षांपूर्वी सदस्य म्हणून माझी नियुक्ती झाली होती. त्यानंतर गेल्यावर्षी महामंडळाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली. अध्यक्ष झाल्यापासून मी महामंडळाच्या कामकाजात बराच बदल करण्याचा प्रयत्न केला. पुर्वी महामंडळाकडे फक्त 27 कर्मचार्यांचा स्टाफ होता. यामुळे महामंडळाच्या कामकाजामध्ये गती येत नव्हती. मात्र मी कर्मचारी भरण्यासाठी सतत पाठपुरावा करत राहिलो. आता 200 पेक्षा जास्त कर्मचारी महामंडळाकडे आहे. प्रत्येक जिल्हा पातळीवर महामंडळाचे कार्यालय आहे. आता महामंडळ विकासाच्या दिशेने पाऊल टाकत आहे. बीड जिल्ह्यामध्ये वक्फच्या जमीनीत भव्यदिव्य वैद्यकीय महाविद्यालय, हॉस्पिटल, अल्पसंख्यांक मुलांसाठी वस्तीगृह व आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे.
तसेच अल्पसंख्यांक समाजाचे पीएचडी करणार्या विद्यार्थ्यांना महामंडळाकडून 1 लाख रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अल्पसंख्यांक समाजातील विधवांना 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्यसुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती समीर काझी यांनी दिली आहे. वक्फच्या उत्पन्नात अडीचपटीने वाढ झालेली आहे. वक्फच्या जमीनीमध्ये अतिक्रमण करणार्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. गेल्या एक वर्षात केलेल्या कामाची व येणार्या काळात प्रगतीत असलेल्या कामांबाबत विरोधकांनी काही लोकांना हाताशी धरून राजकारण करण्याचा कुटील डाव आखल्याचेही काझी यांनी या वेळी म्हटले आहे. वक्फ बोर्डाच्या कामकाजाची चांगली प्रसिद्धी होत असताना विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही विघ्नसंतोषी लोकांच्या माध्यमातून आंदोलन करून वक्फ बोर्डाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.








