
भागवत तावरेंची राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तापदी निवड
बीड (रिपोर्टर): राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या प्रवक्ते पदावर पत्रकार भागवत तावरे यांची आज निवड करण्यात आली. भागवत तावरे हे बीडपासून नजीक असलेल्या नाळवंडी येथील रहिवासी आहेत. पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. तावरे यांच्या नियुक्तीनंतर त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
पत्रकार म्हणून सातत्याने चर्चेत असणारे भागवत तावरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने मोठी जबाबदारी दिली असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तावरे यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. नियुक्तीपत्रात सखोल अभ्यास व माहिती घेऊन निमंत्रीत करतील त्यावेळेस पक्षाची ध्येय-धोरणे व भूमिका प्रसार माध्यमांसमोर सकारात्मक स्वरुपात मांडावी, असे म्हटले आहे. भागवत तावरे हे गेली दहा वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. त्यांना राज्याच्या सामाजीक, राजकीय, भौगोलिक, ऐतिहासिक, आर्थिक सह अन्य गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास आहे. त्यांच्या निवडीनंतर भागवत तावरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
धनंजय मुंडेंनी केलं अभिनंदन
भागवत तावरे यांची पक्ष प्रवक्तेपदी निवड झाल्यानंतर माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी अभिनंदन मित्रा!, असे म्हणत एक्सवर पोस्ट केली. त्यात ते म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री भागवत तावरे यांचे हार्दिक अभिनंदन. आगामी काळात पक्षाचे ध्येय-धोरण व भूमिका मांडताना उत्तरोत्तर यश मिळो ही सदिच्छा. ग्रामीण भागातून आलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना दिलेली ही संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवर्तनवादी विचाराचे प्रतिक आहे.








