
चौकशी करण्याची नातेवाईकांची मागणी
खडकत येथे काल घडली घटना
बीड (रिपोर्टर): आष्टी तालुक्यातल्या खडकत येथील एका हॉटेलमध्ये काम करणार्या वेटरचा मृत्यू झाला. हा मृत्यू इमारतीवरून पडल्याने झाल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मयताच्या नातेवाईकांनी आष्टी पोलिसांसह जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे केली आहे.

गेवराई शहरातील शिवाजीनगर भागात राहणारा सीताराम ढवळे हा आष्टी तालुक्यातील खडकत येथील दत्ता पिसे यांच्या हॉटेलवर वेटर म्हणून काम करत असे. काल तो इमारतीवरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. तशी माहिती पिसे यांनी ढवळे यांच्या नातेवाईकांना कळविली होती. मृतदेहाचे आष्टी येथे शवविच्छेदन करण्यात आले मात्र या मृत्यूबाबत ढवळे यांच्या नातेवाईकांना शंका आहे. सीताराम ढवळे यांचे बंधू महेश रखमाजी ढवळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आष्टी पोलीस व जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीता काँवत यांच्याकडे केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मयताच्या अंगावर जखमा आहेत. त्याचे पीएम झालेले आहे. माझा भाऊ कशाने मरण पावला याची सखोल चौकशी व्हावी व योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस कर आहेत.








