
मारहाण करत विनयभंग, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपी फरार
नेकनूर (रिपोर्टर): गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात गंभीर गुन्हे घडताना दिसून येत असून आज नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात शालेय शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी ही आपल्या मैत्रीनीच्या घरून परत आपल्या घराकडे जात असताना तिघा जणांनी सदरच्या मुलीस उचलून एका चारचाकी गाडीत टाकले. तिचा विनयभंग करत मारहाण केल्याची घटना 2 ऑगस्टच्या दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलिस ठाण्यात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एक अज्ञात व्यक्ती असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
याबाबत अधिक असे की, नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात दुपारी साडेबाराच्या सुमारास सोळा वर्षीय शालेय शिक्षण घेणारी मुलगी ही आपल्या मैत्रीनीच्या घरून शाळेकडे जात होती. त्या दरम्यान शुभम नंदकुमार बोरखेडे, सुनील ऊर्फ सोनू मधुकर केमकर आणि अन्य एक अनोळखी या तिघांनी सदरच्या मुलीस अडवून तिला बळजबरीने उचलले. कारमध्ये टाकले व वाईट हेतुने तिचा विनयभंग केला. त्याचबरोबर ही घटना कोणाला सांगशील तर जिवे मारू, अशी धमकी दिली. याच दरम्यान यातील दोन आरोपींनी पिडीत मुलीला एका पाईपने मारहाण केल्याचेही सांगण्यात येते. या प्रकरणी सदरच्या अल्पवयीन मुलीने नेकनूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून तिघांविरोधात गु.र.नं. 203/25 कलम 137 (2), 74, 118 (1), 115 (2), 3 (5), बीएनएस, सहकलम 8, 12 पोक्सो अॅक्ट कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणाचा पुढील तपास नेकनूर सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी यांच्या आदेशावरून पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शेळके हे करत आहेत.








