
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालकांनी दिले विभाग नियंत्रकांना निर्देश
पात्रुड:(रिपोर्टर)महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात कार्यरत कर्मचार्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 2024-25 च्या शैक्षणिक सत्रात पहिल्या प्रयत्नात दहावी किंवा तत्सम परीक्षेत 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणार्या पाल्यांना लाभ दिला जाणार आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी सर्व विभाग नियंत्रकांना सूचना दिल्या आहेत. एसटी महामंडळाच्या 2008 रोजीच्या ठरावानुसार रा. प. कर्मचार्यांच्या पाल्यांसाठी ’कामगार शिक्षण सहाय्य योजनेंतर्गत’ वर्ष 2024-25 पासून शिष्यवृत्ती आणि उत्तेजनार्थ बक्षीस योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत एसटीत कार्यरत अधिकारी, कर्मचार्यांकडून त्यांच्या पाल्यांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वी किंवा तत्सम परीक्षा मार्च 2025 मध्ये पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन किमान 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणार्या कर्मचार्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत 350 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल. त्यानंतर उर्वरित अर्जामधून गुणानुक्रमे 100 विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील. प्रत्येक विभाग, घटकासाठी 10 शिष्यवृत्तींची मर्यादा राहील.
अर्जासाठी आवश्यक अटी व कागदपत्रे
अर्जासोबत दहावीची प्रमाणित गुणपत्रिका आणि पुढील वर्गासाठी घेतलेल्या प्रवेशाची प्रमाणित पावती जोडणे आवश्यक आहे. यासोबतच इतर बोर्डातील (सीबीएसई, आयसीएसई, आयबी इ.) विद्यार्थ्यांनी ग्रेडेशनचे परावर्तीत गुण दाखवणारी साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. रोजंदार व अर्धवेळ कर्मचार्यांसह सर्व अधिकारी व कर्मचारी अर्ज करण्यास पात्र आहेत.








