
जागोजागी कचर्याचा ढिग, परिसरात दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
बीड (रिपोर्टर): पांगरी रोड लगत असलेल्या जगदंबा कॉलनी परिसरात रस्ते, नाल्यांचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबीत आहे. याठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. जागोजागी कचर्याचे ढिग पडलेले आहेत. या परिसरात कचर्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदरील परिसरात रस्ते व नाल्या बनवून रस्त्यावरील टाकलेला कचरा उचलावा, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, बीडचे पालकमंत्री अजित पवार हे बीडला येत असल्याने शहरातले मुख्य रस्ते स्वच्छ केले मात्र गल्लीबोळातील घाण नगरपालिका प्रशासनाने उचलली नाही.
पांगरी रोड लगत असलेल्या सौभाग्य लॉन्ससमोरील जगदंबा कॉलनीत रस्त्याचा प्रश्न प्रलंबीत आहे. त्याचबरोबर या भागात नाल्या नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्याने वाहत आहे. नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी येथील कचरा वेळेवर उचलत नसल्याने मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला. या दुर्गंधीयुक्त कचर्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिका प्रशासनाने याची दखल घेऊन या कॉलनीत रस्ते, नाल्या कराव्यात तसेच रस्त्यावर टाकलेला कचराही उचलावा, अशी मागणी केली जात आहे.








