उत्तर महाराष्ट्राचा पंच, मराठवाड्याचा चौकार, एकट्या औरंगाबादेत तीन मंत्रिपद, वादग्रस्त संजय राठोड शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात
बीड (रिपोर्टर) 40 दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर 34 महिन्यातल्या तिसर्या सरकारचा शपथविधी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या उपस्थितीत राजभवनात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुरुषप्रधान मंत्रिमंडळात एकाही महिला मंत्र्यास संधी देण्यात आली नाही. मात्र उत्तर महाराष्ट्रातील पाच, मराठवाड्यातील चार, पश्चिम महाराष्ट्रातील तीन, विदर्भ, कोकण, मुंबई, ठाणे भागात प्रत्येकी दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळात सहभाग देऊन एकूण 18 जणांना आज पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. भाजपाच्या 9 तर शिंदे गटाच्या 9 आमदारांनी शपथ घेतली.
2019 च्या सप्टेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या, जुलै 2022 पर्यंत 34 महिन्यात तिसर्या सरकारचा आज शपथविधी झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 39 दिवसांपुर्वी सरकार स्थापन करून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. तेव्हापासून गेली 40 दिवस महाराष्ट्र मंत्र्यांविना होता. अखेर आज शिंदे-फडणवीसांच्या सरकारचा पुरुषप्रधान मंत्रिमंडळ विस्तार झाला. भाजपाच्या 9 आणि शिंदे गटाच्या 9 मंत्र्यांना यामध्ये शपथ देण्यात आली. यामध्ये भाजपाकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावीत, गिरीष महाजन, सुरेश खाडे, रविंद्र चव्हाण, अतुल साळवे आणि मंगलप्रभात लोढा तर शिवसेनेच्या फुटीर गटामधून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुंबरे, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभुराजे देसाई या नऊ जणांना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर अखेर महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळाले. मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही. यासह भाजपाच्या आरोपामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोडांना पुन्हा भाजपाच्या सरकारमधील मंत्रिमंडळात समाविष्ट केल्याने भाजपाच्या चित्रा वाघ यांनी या गोष्टीचा निषेध केला आहे. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर विस्तार लवकर केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शिंदे-फडणवीसांचं पुरुषप्रधान मंत्रिमंडळ
40 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शिंदे-फडणवीसांचं अखेर मंत्रिमंडळ झालं. देशात 50 टक्के महिला असताना शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मात्र एकाही महिलेचा सहभाग दिवसून आला नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीसांचं मंत्रिमंडळ हे पुरुषप्रधान असल्याचं जाणवतं.
संजय राठोडांना मंत्रिपद, भाजपाच्या चित्रा वाघ भडकल्या
संजय राठोड हे मंत्रिपदाची शपथ घेत असताना भाजपाच्या चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या. त्यांनी यासंदर्भात ट्विट करत आणि प्रत्यक्ष माध्यमाशी बोलताना आपली नाराजी उघड केली. संजय राठोड यांना मंत्रिपद देणं दुर्दैवी असल्याचे म्हणत संजय राठोड यांच्याविरुद्ध लढा सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले.
वादग्रस्त मंत्र्याचा मंत्रिमंडळात सहभाग
पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील आरोपावरून तत्कालीन आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात असलेले संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. भाजपाने ज्यांच्या राजीनाम्यासाठी रान उठवले होते अखेर भाजपाच्याच सत्तेमध्ये त्या संजय राठोडांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
पंकजा मुंडेंना संधी नाहीच
शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये भाजपाकडून ज्या 9 कॅबिनेट मंत्र्यांना शपथ देण्यात आली ते सर्व फडणवीसांचे खंदे समर्थक मानले जातात. सत्तांतर झाल्यानंतर पंकजा मुंडेंचे पुनर्वसन होईल आणि त्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाईल, असे वाटत असताना 18 कॅबिनेट मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे. आतापर्यंत तीन ते चार वेळा भाजपाकडून पंकजा मुंडेंना डावललं गेलं आहे.