–

श्रावण सोमवारी शिवालयात भाविकांची रेलचेल
परळी वैद्यनाथासह जिल्ह्यातील सर्व शिवमंदिरात भक्तांची मोठी गर्दी; पोलिसांचा कडक बंदोबस्त
बीड (रिपोर्टर):श्रावण महिन्याच्या पवित्र तिसर्या सोमवारी आज जिल्हाभरातील शिवालय भक्तांच्या जयघोषाने दुमदुमून गेले. पहाटेच्या पहिल्या प्रहरापासूनच हर हर महादेवच्या निनादाने मंदिरांच्या गाभार्यापासून गावोगावचे रस्ते मंगलमय झाले. उपवास, अभिषेक, रुद्राभिषेक व जलाभिषेकासाठी हजारो भाविकांनी शिवधामाचा मार्ग धरला. परळीतील वैद्यनाथाच्या मंदिरात दुपारपर्यंत लाखो भाविकांनी दर्शन घेतले होते. पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनीही प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त याठिकाणी ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या शिवालयातही भक्तांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. श्रावणी सोमवारनिमित्त आज जिल्हाधिकार्यांनी सुट्टी जाहीर केलेली आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्यभरातील भक्तांचा जनसागर परळीत ओसंडून वाहत होता. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची रांग लांबच लांब पसरली. गर्दी नियंत्रणासाठी परळी शहरात पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक नियंत्रण, सुरक्षा तपासणी व भाविकांना मार्गदर्शनासाठी स्वयंसेवक तैनात होते.बीड शहरातील सोमेश्वर, पापनेश्वर, कंकाळेश्वर या प्रमुख मंदिरांतही दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. सकाळी भाविकांच्या हातातील अभिषेकासाठी आणलेले जलकुंभ, फुलांचे हार, बेलपत्रांनी मंदिर परिसर रंगून गेला होता. कपिलधर, सौतडा, चाकरवाडी, गोरक्षनाथ टेकडी, नारायण गड, भगवान गड यांसह अन्य मंदिरातही भाविकांनी पूजा-अर्चना केली. मंदिर परिसरात पूजासाहित्य विक्रेते, प्रसाद स्टॉल्स, फुलविक्रेते यांचीही मोठी गर्दी होती. भाविकांच्या गर्दीने व्यापार्यांचाही दिवस गोड झाला. भजन, कीर्तन, हरिनामाचा गजर आणि शिवतांडव स्तोत्राच्या निनादाने संपूर्ण जिल्हा भक्तिरसात न्हाऊन निघाला.








