
येवता तांड्यावर साडेचार लाखांची तर कोल्हेवाडीत अडीच लाखांची जबरी चोरी
केज (रिपोर्टर): केज तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून तालुक्यातल्या येवता तांडा येथील पत्र्याच्या शेडच्या दाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत नगदी 2 लाख 60 हजार रुपयांसह 1 लाख 55 हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना 21 च्या मध्यरात्री 1 ते 4 वाजण्याच्या दरम्यान घडली. तर त्याआधी 20 तारखेच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी कोल्हेवाडी येथील घरामधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकल चोरून तब्बल 2 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज पळवल्याची घटना घडल्याने या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक असे की, गेल्या दोन दिवसांमध्ये केज तालुक्यात कोल्हेवाडी व येवता तांडा या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चोर्या करून या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करून सोडले आहे. येवता तांडा येथील आत्माराम बन्सी राठोड यांच्या पत्र्याच्या शेडच्या घराचे दरवाजे तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. घरामधून 500 च्या तब्बल 207 नोटा व शंभरच्या 300 नोटा असे एकूण 2 लाख 60 हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा तब्बल 4 लाख 32 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी आत्माराम राठोड यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गु.र.नं. 455/2025 कलम 331 (4), 305 भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर कोल्हेवाडी येथे बाबासाहेब दैवत मिसाळ यांच्या घरी 20 तारखेला चोरी झाली. मिसाळ यांचे घर उघडे होते. अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेा करत एक मोटारसायकलसह घरातले सोने-चांदीचे दागिने असा एकूण 2 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी केज पोलिसात मिसाळ यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. 456/2025 कलम 305 (1), 303 (2) भा.न्या.संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





