
हार्वेस्टर खरेदीसाठी शासन 35 लाखांचे अनुदान देतंय
वाढत्या हार्वेस्टरमुळे उसतोड मजुरांच्या मजुरीचा प्रश्न निर्माण होणार
बीड, (रिपोर्टर)ः- महाराष्ट्रामध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. उस मजुरा मार्फत तोडला जातो. मात्र गेल्या तीन ते चार वर्षापासुन उसतोडणीसाठी हार्वेस्टर आले. हार्वेस्टर घेण्यासाठी शासन 35 लाख रूपयांचे अनुदान देत असल्याने दरवर्षी हार्वेस्टरची संख्या वाढू लागली. यंदा 263 हार्वेस्टर खरेदी करण्यात आले. मराठवाड्यातील 50 टक्के उस हा हार्वेस्टरने तुटणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाढत्या हार्वेस्टरमुळे उसतोड मजूरांच्या मजुरीचा प्रश्न भविष्या निर्माण होवू शकतो.
बीड जिल्ह्यातून दरवर्षी साडे चार ते पाच लाख मजुर महाराष्ट्रासह इतर राज्यात उसतोडीसाठी जात असतात. राज्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सर्वाधिक उस पश्चिम महाराष्ट्रात असून मराठवाडा व इतर क्षेत्रातही उसाची लागवड केली जात आहे. गेल्या काही वर्षापासून उसतोडणीसाठी हार्वेस्टर आले. दिवसेदिवस हार्वेस्टरची संख्या वाढू लागली. हार्वेस्टर खरेदीसाठी शासन 35 लाखांचे अनुदान देत असल्याने साखर कारखाने, मुकादम, शेतकरी, व्यवसायिक हार्वेस्टर खरेदी करू लागले. यंदा 263 हार्वेस्टरखरेदी करण्यात आले. या हार्वेस्टरला शासनाने 88 कोटींचा निधी वितरित केला आहे. मराठवाड्यात यावर्षी उसाची लागवड वाढली.
यंदा 50 टक्के उस हा हार्वेस्टरनेच निघणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एक हार्वेस्टर यंत्र दररोज 150 ते 160 टनापर्यंत उस तोडत आहे तर मजुराची जोडी 1 ते दीड टन उसतोडते. टनामागे मजुरांना 366 रूपये मिळतात तर हार्वेस्टरला टनामागे 450 ते 500 रूपये द्यावे लागते. दिवसेदिवस हार्वेस्टरची संख्या वाढत राहिली तर उसतोड मजुरांना मजुरी मिळते की नाही? असाही प्रश्न आता उपस्थित होवू लागला.





