
चोरट्याने घर साफ केले
नेकनूर, (रिपोर्टर)ः- मुंबई येथे मराठा आंदोलनामध्ये राज्यभरातून लाखो मराठा बांधवांचा सहभाग आहे. बीड येथीलही अनेक जण गेले असून नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदवाडी येथील एक शेतकरी घराला कुलूप लावून आंदोलनात सहभागी झाले होते ते परत घरी आल्यानंतर त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे निर्देशनास आले. चोरट्याने सोन्या चांदीच्या दागिन्यासह नगदी रक्कम चोरून नेली.
अशोक रामभाऊ वळे (रा.आनंदवाडी ह.मु.काळे वस्ती) यांनी आपल्या पत्नीस व मुलास सासरवाडीला सोडून ते मुंबई येथे आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले होते. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या धरामध्ये चोरी केली. चोरट्याने घरातील सोन्याचे झुंबर, मिनीगंठन, दहा ग्रामच्या दोन अंगठ्या, चार ग्रामचे लॉकीट, नगदी 35 हजार रूपये असा एकूण 1 लाख 19 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. वळे हे 31 तारखेला परत आल्यानंतर त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाची तक्रार त्यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अज्ञात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








