
अंबाजोगाई येथील दुर्देवी घटना, बसचालक नशेत होता
अंबाजोगाई, (रिपोर्टर)ः- राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या चाकाखाली आल्याने एका महिला प्रवाशीचा आज सकाळी 7 वाजता दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई येथील मोरेवाडीच्या पाण्याच्या टाकीजवळ घडली. बस चालक नशेत होता त्यामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आलेला आहे.
केज येथील मुळ रहिवाशी असलेल्या आणि मागील 35 वर्षापासून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय आणि रूग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणुन कार्यरत असलेल्या विजयमाला नाथाभाऊ सरवदे (वय 55) यांचा आज सकाळी धारूर आगाराची धारूर-परळी एसटी बस क्रं. एम.एच.15.एम.एच 2347 या गाडीच्याखाली चिरडून दुर्देवी मृत्यू झाला. बस चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. विजयमाला सरवदे या रोजच्या प्रमाणे सकाळी 6 वाजता आपल्या घरातून कामावर जाण्यासाठी निघाल्या होत्या. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्या अंबाजोगाई येथील मोरेवाडी पाण्याच्या टाकीजवळ बसमधून उतरत होत्या. त्याचवेळी बसचालकाच्या लक्षात आले नाही की सरवदे या खाली उतरल्या आहेत. त्याने बसपुढे घेतली आणि त्या बसच्या चाकाखाली आल्या. या अपघातात गंभीर रित्या जखमी झालेल्या सरवदे यांना रूग्णालयात दाखल केले मात्र दाखल करण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताला जबाबदार असलेल्या चालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.








