
महाराणा प्रताप चौकात रात्री घडली घटना
आरोपी अट

बीड (रिपोर्टर): मोटारसायकलची चावी काढण्याच्या कारणावरून दोघा मित्रात बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यावसन मारामारीत झाले. एका मित्राने दुसर्या मित्राच्या छातीत चाकू भोसकल्याने गंभीररित्या जखमी झाल्याने त्यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना रात्री महाराणा प्रताप चौक परिसरात घडली. या प्रकरणातील आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

अभिषेक राम गायकवाड (वय 27, रा. काटवटवाडी), विजय सुनिल काळे (वय 22, रा. स्वराज्यनगर) व अन्य दोघे असे चौघे रात्री विजय काळे यास महाराणा प्रताप चौकात मोटारसायकलवर सोडण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी गेल्यानंतर गाडीची चावी काढण्याच्या कारणावरून अभिषेक गायकवाड व विजय काळे या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसन मारामारीत झाले. अभिषेक गायकवाड याने आपल्या जवळील चाकू काढून विजय काळे याच्या छातीमध्ये भोसकला, यात तो गंभीररित्या जखमी झाल्याने त्यास अन्य दोन मित्रांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान विजय काळे याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुनिल मारुती काळे (रा. स्वराज्यनगर) याच्या फिर्यादीवरून आरोपी अभिषेक गायकवाड याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दुनघव हे करत आहेत.








